Breaking News

अश्‍विनची आता इम्रान खानच्या विक्रमावर नजर

Ravichandran Ashwin
पुणे/प्रतिनिधी
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसर्‍या टेस्ट मॅचला सुरुवात झाली आहे. पहिल्याच टेस्ट मॅचमध्ये अश्‍विनने सगळ्यात जलद 350 विकेट घेण्याच्या मुरलीधरनच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. मुरलीधरन आणि अश्‍विन यांनी 66 मॅचमध्ये 350 विकेट घेतल्या. अश्‍विनने विशाखापट्टणममध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये 8 विकेट घेतल्या होत्या. पुण्यातल्या टेस्टमध्ये अश्‍विनने 6 विकेट घेतल्या तर तो डेनीस लिली आणि चामिंडा वास यांच्या 355 विकेटचं रेकॉर्ड मोडू शकतो. वास आणि लिली यांच्या खात्यात 355 विकेट आहेत. अश्‍विनचा सध्याचा फॉर्म बघता त्याच्यासाठी हे आव्हान फारसं कठीण नाही.
लिली आणि वास यांच्याप्रमाणेच अश्‍विनच्यासमोर इम्रान खान आणि डॅनियल व्हिटोरी यांचाही विक्रम आहे. इम्रान आणि व्हिटोरी यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये प्रत्येकी 362-362 विकेट घेतल्या आहेत. पुणे टेस्टमध्ये अश्‍विनला हे रेकॉर्ड मोडता आलं नाही, तरी रांचीमध्ये होणार्‍या तिसर्‍या टेस्टमध्ये अश्‍विन इम्रान खान आणि व्हिटोरीच्याही पुढे जाऊ शकतो. अश्‍विनने त्याच्या कारकिर्दीत एकदा मॅचमध्ये 13 विकेट घेतल्या आहेत.
भारताकडून सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे. कुंबळेने टेस्टमध्ये 619 विकेट घेतल्या. कुंबळेनंतर कपिल देव (434 विकेट) आणि हरभजन सिंग (417 विकेट) यांचा नंबर लागतो. 400 विकेटचा आकडा गाठायला अश्‍विनला आणखी 50 विकेटची गरज आहे. पुढच्या 2 वर्षात अश्‍विनकडून अशीच कामगिरी झाली तर त्याला हरभजन आणि कपिल देव यांचाही विक्रम मोडता येईल.