Breaking News

मोदींविरोधात बोलल्यास गजाआड करण्याचे धोरण- राहुल गांधी

वायनाड, केरळ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना झुंडबळी रोखण्याबाबत पत्र पाठवणार्‍या पन्नास वलयांकित व नामांकित  व्यक्तींवर प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात आल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली असून नरेंद्र मोदी किंवा त्यांच्या सरकारविरोधात कुणी शब्द जरी  काढला तरी त्याला गजाआड करण्यात येईल, असेच देशातील सध्याचे चित्र असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
गांधी म्हणाले, की  देश आता एकाधिकारशाहीकडे वाटचाल करीत असून यात कुठेलही गुपित राहिलेले नाही. देशात काय चालले आहे हे लोकांना कळते आहे.
बंदीपूर व्याघ्र सुरक्षा क्षेत्रात महामार्गावरून रात्री प्रवासास बंदी घातल्याच्या विरोधात करण्यात आलेल्या निदर्शनांना पाठिंबा देण्यासाठी राहुल गांधी हे त्यांच्या वायनाड मतदारसंघात आले होते.
ते म्हणाले, की जो कुणी पंतप्रधानांविरोधात काही बोलेल, सरकारविरोधात काही सांगेल त्याला तुरूंगात टाकले जाईल, त्याच्यावर हल्ले केले जातील. माध्यमांना तर चिरडून टाकण्यात आले आहे.  देशात काय चालले आहे ते सगळ्यांना कळते आहे.
बिहारमध्ये मुझफ्फरपूर येथे रामचंद्र गुहा, मणी रत्नम, अदूर गोपाळकृष्णन, अपर्णा सेन यांच्यासह पन्नास नामांकित व्यक्तींविरोधात प्राथमिक माहिती अहवाल दाखल करण्यात आला आहे.