Breaking News

शिवरायांचे जीवनकार्य हे दैवी चमत्कार : बोरनारे अँकर


कोपरगाव / ता.प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन म्हणजे एक दैवी चमत्कारच होता. संपूर्ण विश्वात असा अद्वितीय, अलौकीक आणि अतुलनीय दुसरा राजा होणे नाही असे उद्गार शिव व्याख्याते  अमोल बोरनारे यांनी बोलकी येथे आयोजित व्याख्यानातून काढले.
कोपरगाव तालुक्यातील बोलकी येथील रेणुकामाता मंदिरास २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आणि नवरात्रोत्सवानिमित्त रेणुकामाता मित्रमंडळ आणि राजे ग्रुप यांच्यावतीने बोरनारे यांचे  व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यांच्यासमवेत युवा सामाजिक कार्यकर्ते शुभम बोरनारे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी रेणुकामाता व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. मंडळाच्यावतीने व्याख्याते बोरनारे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी परिसरातील अनेक भावीक, शिवप्रेमी युवक कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 बोरणार पुढे म्हणाले की, केवळ महाराष्ट्रातल्याच नव्हे तर भारतातल्या प्रत्येकासाठी शिवाजी महाराज स्फूर्तीदायी दैवत होते. त्यांची पारतंत्र्याकडून स्वातंत्र्याकडे जाण्याची प्रेरणा महाराष्ट्राचा इतिहास निर्माण करुन गेली. त्यांचे कार्य प्रारंभी जरी महाराष्ट्राच्या पारतंत्र्याविषयीचा विरोध प्रगट करुन स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नापुरता मर्यादित वाटत असला तरी लोकांच्या मनात जी स्वातंत्र्यप्रेमाची ज्योत पेटली त्यामुळे पुढे अखंड भारतात दक्षिणोत्तर ती प्रेरणा प्रत्येकाच्या मनात निर्माण होत गेली. त्या प्रेरणेमुळेच सर्वसामान्य लोकांच्या जीवनात त्यांनी जगण्याची प्रचंड शक्ती निर्माण केली.