Breaking News

क्रिडा प्रकारात यश संपादन करणार्‍या विद्यार्थ्यांचा गुणगौरव

पाथर्डी/प्रतिनिधी
शहरातील श्री तिलोक जैन उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्यस्तर, विभाग स्तर व जिल्हास्तरीय वरील विविध क्रिडा प्रकारात नेत्रदिपक यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार समारंभ सोहळा श्री तिलोक जैन उच्च माध्यमिक विद्यालयात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष चंपालालजी गांधी हे होतेे. यावेळी संस्थेचे सचिव सतीश गुगळे, खजिनदार सुरेश कुचेरिया, विश्‍वस्त धरमचंद गुगळे, राजेंद्र मुथ्या, कार्यकारिणी मंडळाचे सदस्य चांदमल देसर्डा, प्रशासकीय अधिकारी बबन फुंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते. शालेय क्रीडा प्रकारात विद्यालयातील खालील खेळाडूंनी नेत्रदीपक यश प्राप्त केले. यामध्ये कुस्ती स्पर्धेत 14 वर्षे वयोगटात चैतन्य जाधव या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. तर वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये 17 वर्षे वयोगटात मध्ये प्रशांत सोलाट या विद्यार्थ्यांची राज्यस्तरावर निवड झालेली आहे. यासह धावणे, बुद्धीबळ, व्हॉलीबॉल यासह विविध मैदानी खेळामध्ये विद्यालयातील जवळपास 35 विद्यार्थ्यांनी नेत्रदिपक यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलतांना मंडळाचे उपाध्यक्ष चंपालाल गांधी म्हणाले की, खेळ हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे.खेळामुळे खेळाडू नेहमी प्रगतीपथाकडे वाटचाल करतो. खेळाडूंनी जीवनामध्ये खेळाला मोठे महत्त्व दिले तर खेळाडू यशस्वीपणे आपले जीवनमान उंचावू शकतो असे सांगितले. सर्व खेळाडूंना क्रिडा शिक्षक अजय शिरसाट, जब्बार पठाण, अजय भंडारी व वृषाली कर्नावट यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य अशोक दौंड यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन सुनील कटारिया यांनी केले. तर आभार पर्यवेक्षक विजय छाजेड यांनी मानले.