Breaking News

आदिवासी आजीच्या पेटिंग इटलीतल्या प्रदर्शनात झळकल्या

नवी दिल्ली
पतीच्या निधनानंतर दु:खाने खचून न जाता 80 वर्षांच्या आदिवासी आजीने अविश्‍वसनीय वाटावा असा लौकिक मिळवला आहे. मूळच्या मध्य प्रदेशातील असलेल्या जोधईया बाई बैगा असं त्यांचं नाव आहे. पतीच्या निधनानंतर त्यांनी काढलेल्या पेटिंग आता इटलीतल्या मिलन येथे सुरू असलेल्या प्रदर्शनात लावण्यात आल्या आहेत.
जोधईया बाई बैगा या मध्य प्रदेशातील उमरिया जिल्ह्यातील लोहरा गावात राहतात. चाळीस वर्षापूर्वी त्यांच्या पतीचं निधन झालं. या दु:खाने कोलमडून न जाता त्यांनी स्वत:तील कलागुणांकडे लक्ष दिलं. त्यानंतर सलग चार दशकांपासून त्या पेटिंग काढत आहेत. त्यांच्या या पेटिंग सातासमुद्रापार पोहोचल्या असून, इटलीतील मिलन येथे सुरू असलेल्या प्रदर्शनात लागल्या आहेत.
प्रदर्शनात पेटिंग लागल्यानंतर जोधईया बाई बैगा म्हणाल्या, चाळीस वर्षांपूर्वी माझ्या पतीचे निधन झाले. त्यानंतर मी चित्र काढण्यास सुरूवात केली. माझ्या आजूबाजूला जे दिसेल त्याची आणि सर्व प्राण्यांची चित्रे काढली. चित्र काढण्यासाठी मी भारतातील अनेक भागात फिरले. आता मी पेटिंगशिवाय दुसर काहीही करत नाही. कुटुंबाच्या उदरर्निवाह करण्यासाठी मी इतर काम केलं. आंतरराष्ट्रीय स्तरावर माझ्या पेटिंग लागल्याचा प्रचंड आनंद होत आहे.
जोधईया बाई बैगा यांच्या पेटिंगविषयी बोलताना त्यांचे शिक्षक आशिष स्वामी म्हणाले, दु:ख आणि त्रास पाठीमागे सोडून त्यांनी चित्रकलेवर लक्ष केंद्रीत केलं. त्यांच्या पेटिंग इटलीतल्या प्रदर्शनात लावण्यात आली आहेत. त्याबद्दल मला फार आनंद होत आहे. पण, त्यांना आणखी बरेच काही साध्य करायचे आहे. कोणतंही नीट शिक्षण घेतलेलं नसताना त्यांना मिळालेला हा लौकिक आदिवासी समुदायासाठी अभिमानाचा क्षण ठरला आहे. ही घटना इतर समुदायातील लोकांना अशा प्रकारची कला जोपासण्यासाठी प्रेरणा देणारी आहे, असं स्वामी म्हणाले.