Breaking News

नवाज शरीफ यांना अटक

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना शुगर मिल्सप्रकरणी शुक्रवारी अटक करण्यात आली. नॅशनल अकाऊंटिबिलिटी ब्युरोने  ही कारवाई केली असून अटकेनंतर त्यांना लाहोरच्या एनएबी कोर्टात हजर करण्यात आले. शरीफ आणि त्यांच्या कुटुंबियांवर पाकिस्तानातील साखर कारखान्यांमध्ये आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप आहे.

एनएबीच्या आरोपांनुसार, शरीफ यांच्या कुटुंबियांनी साखर कारखान्यांमध्ये शेअर्सच्या खरेदी-विक्रीच्या आडून मोठी आर्थिक अफरातफर केली आहे. यांपैकी चौधरी शुगर मिल्समध्ये तर ते प्रत्यक्ष लाभार्थी असल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

एनएबीने नवाज शरीफ यांच्या कन्या मरियम शरीफ यांच्यावर देखील याप्रकरणी आरोप केले आहेत. त्यानुसार, मरियम यांना त्यांचे चुलत बंधू युसूफ अब्बास यांच्यासोबत ऑगस्ट महिन्यांत अटक करण्यात आली होती. एएनबीने म्हटले होते की, साखर कारखान्यांमध्ये मरियम यांचे 12 मिलिअनपेक्षा अधिक मुल्यांचे शेअर्स आहेत.