Breaking News

हुतात्मा जवानांच्या नातेवाइकांना यापुढे चौपट आर्थिक मदत : राजनाथ सिंह

नवी दिल्ली
भारतीय लष्कराची अनेक दिवसांची प्रलंबित मागणी पूर्ण करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी प्रत्यक्ष लढताना मरण पावणार्‍या जवानांच्या नातेवाइकांना दिल्या जाणार्‍या अर्थसाह्यात  सहा लाखांची वाढ केली आहे.
सध्या 2 लाख रुपये अर्थसाह्य  दिले जात होते, ते  आता 8 लाख रुपये करण्यात आले आहे. अधिकृत सूत्रांनी शनिवारी सांगितले की, ही वाढ चार पट असून लष्करी  दुर्घटना कल्याण निधी अंतर्गत ही मदत मंजूर केली जाते. सध्या यात जवानाचा मृत्यू झाल्यास 2 लाख रुपये मदत दिली जाते. जे सैनिक साठ टक्के जायबंदी होतात व काही जण अपंग होतात त्यांनाही ही मदत लागू असते. कुटुंब निवृत्ती वेतन,  लष्करी विमा, लष्करी कल्याण मंडळ व सानुग्रह अनुदान याशिवाय हे अर्थसाह्य दिले जाते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हे अर्थसाह्य वाढवण्यास तत्त्वत: मंजुरी दिली आहे. त्यामुळे सध्या जे 2 लाख रुपये दिले जातात त्याऐवजी आठ लाख रुपये दिले जातील.
लष्करी युद्ध दुर्घटना कल्याण मंडळ ( एबीसीडब्ल्यूएफ) कडून  ही मदत मंजूर केली जात असते. माजी सैनिक कल्याण मंडळ विभागाने लष्करी युद्ध कल्याण मंडळाची स्थापना फेब्रुवारी 2016 मध्ये सियाचेन भागात 10 सैनिक हिमाप्रपाताखाली गाडले गेल्यानंतर  जुलै 2017 मध्ये केली होती. कामगिरीवर असताना मरण पावणार्‍या जवानांच्या नातेवाइकांना किंवा खूपच जायबंदी होणार्‍या जवानांना  त्यांच्या पदानुसार सानुग्रह अनुदान 25 ते 45 लाख रुपये आहे. लष्करी समूह विमा योजनेतून 40 ते 75 लाख पर्यंत रक्कम मिळू शकते.