Breaking News

चंद्रकांत पाटलांनी केला खळबळजनक दावा

मुंबई
लोकसभा निवडणुकीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना आपल्याकडे खेचत भाजपने विरोधकांना धक्का देण्यास सुरुवात केली. त्यानंतर थेट विधानसभा निवडणुकीपर्यंत हे धक्कातंत्र सुरूच राहिले. आता पुन्हा एकदा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एक दावा करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.

’आम्ही आता थकलो आहोत. त्यामुळे भविष्यात काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येतील,’ या काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्याविषयी चंद्रकांत पाटील यांना प्रश्‍न विचारण्यात आला. त्यावर बोलताना चंद्रकात पाटील यांनी एक खळबळजनक दावा केला. ’काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांचं माहीत नाही, पण त्यांची मुलं तिथं कंटाळली आहेत. त्यामुळेच ती आमच्याकडे येत आहेत. त्यामुळे भविष्यात पवारांच्या घरातील कुणी भाजपमध्ये आलं तर आश्‍चर्य वाटू देऊ नका,’ असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी एकच खळबळ उडवून दिली.

शरद पवार देणार उत्तर?

भाजपचं दिल्लीतील नेतृत्व आणि महाराष्ट्रातीलही नेते विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना लक्ष्य करत आहेत. शरद पवार हेदेखील आपल्या जाहीर सभांमधून भाजपवर पलटवार करत आहेत. शरद पवार यांची आज नागपूर जिल्ह्यात प्रचार सभा होणार आहे. त्यामुळे या सभेत चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर शरद पवार काही उत्तर देतात का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. सर्वच प्रमुख राजकीय पक्षांचे दिग्गज नेते प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे आज पश्‍चिम महाराष्ट्राच्या दौर्‍यावर असून त्यांची जाहीर सभा होणार आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील राज्यभर फिरत असून त्यांची नागपूर जिल्ह्यात सभा होणार आहे.