Breaking News

राहुरी फॅक्टरी येथे महिलेच्या गळ्यातील गंठण ओरबडले!

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी
वळण येथून कोल्हारला निघालेल्या महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्यांचे सोन्याचे गंठण राहुरी फॅक्टरी येथे पल्सर गाडीवरून आलेल्या आरोपींनी ओरबाडून धूम ठोकल्याने महिला वर्गात घबराट पसरली आहे.
स्वाती बळीराम कार्ले या वळण येथे राहणार्‍या गृहिणी आपल्या महिला नातेवाइकासमवेत बोलेरो जीपमधून कोल्हार येथे जात असताना राहुरी फॅक्टरी येथे फळे घेण्यासाठी थांबल्या असता त्यांनी आपली गाडी नगर-मनमाड रस्त्यालगत असणार्‍या शॉपिंग कॉम्प्लेक्स समोर लावून फळे घेण्यासाठी गेल्या. फळे घेऊन परतत असताना आधीच पाळत ठेवून असलेल्या पल्सर गाडीवरील दोन तरुणांनी स्वाती कार्ले यांच्या गळ्यातील तीन तोळ्याचे गंठन ओरबाडून धूम स्टाईल ने पोबारा केला.
 राहुरी फॅक्टरी येथे अत्यंत गजबजलेल्या ठिकाणी भर दुपारी साडे बारा वाजता घडलेल्या या घटनेमुळे महिला वर्गात घबराट पसरली आहे. सध्या नवरात्र उत्सव सुरू असल्याने महिलांना घराबाहेर जाणे गरजेचे असतांना या घटनेमुळे भीती निर्माण झाली आहे. राहुरी पोलीस ठाण्याचे पोनि. मुकुंद देशमुख यांनी पदभार स्वीकारपासून  नगर-मनमाड रस्त्यावर होणार्‍या लुटमारच्या घटना व धूम-स्टाईल चोरीला आळा बसल्याचे जाणवत होते. परंतु या घटनेमुळे या गुन्हेगारानी पुन्हा डोके वर काढण्यास सुरवात केली आहे. दरम्यान ज्या दुकानासमोर ही घटना घडली आहे त्या दोनही दुकानात असलेल्या सिसिटिव्हीच्या कॅमेर्‍यात सदरचे चोरटे कैद झाले असल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस निवडणूक कामात व्यस्त असल्याचे हेरून गुन्हा करणारे गुन्हेगार लवकरच जेरबंद झालेले दिसतील असा विश्‍वास पोनि. मुकुंद देशमुख यांनी व्यक्त केला आहे.