Breaking News

करमाळ्यात राष्ट्रवादीवर ओढवली नामुष्की

सोलापूर
विधानसभा निवडणूक अवघ्या 9 दिवसांवर असताना मात्र उमेदवारीचा घोळ कायम आहे. करमाळ्यात चक्क आपल्याच उमेदवाराला मतदान करू नका, असं पत्रक काढण्याची नामुष्की राष्ट्रवादीवर ओढवली आहे. फक्त करमाळ्यातच नाहीतर सांगोल्यातही काहिसा असाच घोळ राष्ट्रवादीने घालून ठेवल्यामुळे तो निस्तारणं कठीण होऊन बसलं आहे.

संजय पाटील घाटणेकर हे करमाळ्यातील राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार आहेत पण अजित पवारांनी मात्र, त्यांच्याऐवजी अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे यांना मतदान करण्याचं आवाहन राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना केलं. राष्ट्रवादी काँग्रेसने याबाबत एक प्रसिद्धी पत्रक काढले आहे. संजय पाटील घाटणेकर यांचा अर्ज काही तांत्रिक अडचणीमुळे अर्ज मागे घेता न आल्यामुळे त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संजयमामा शिंदे यांना मतदान करावं असं आवाहन अजित पवार यांनी पत्रक वाचून केलं आहे.

राष्ट्रवादीच्या या यू टर्नमुळे संजय पाटील घाटणेकर मात्र, चांगलेच संतापले आहेत. अजितदादांना आपला हिसका दाखवून देऊ, अशी धमकीच त्यांनी देऊन दिली आहे.

करमाळा राष्ट्रवादीतला हा घोळ कमी काय म्हणून तिकडे सोलापूर शहर उत्तरचे पवारनिष्ठ उमेदवार मनोहर सपाटे यांनी तर कहरच केला. त्यांनी चक्क राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचल रॅलीलाच गुलाबी पाकळ्याच्या पायघड्या घालण्याचा पराक्रम केला. बरं करून थांबतील ते सपाटे कसले, त्यांनी एका दिंडोरीच्या बाबाचं भविष्य ऐकूण आपण जिंकणार असल्याचा दावाही केला आहे. तिकडे सांगोल्यातही आपला माजी जिल्हाध्यक्ष सोडून शेकापला पाठिंबा देण्याचा फतवा राष्ट्रवादीला काढावा लागला आहे. अर्थात हे सगळे घोळ आयारामांवर डोळा ठेवल्याने झालेत. कधीकाळीच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी यावेळी नेमकी कशी परफॉर्म करतेय आणि युतीला शह देण्यासाठी आणखी काय स्ट्रॅटर्जी आखते ते पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.