Breaking News

पवारांच्या समर्थकाकडून पडळकरांचा सत्कार, बारामतीत खळबळ

बारामती
राष्ट्रवादीचे नेते आणि बारामती विधानसभा मतदारसंघातील उमदेवार अजित पवार यांचे सूचक सतिश काकडे यांनी भाजपचे बारामतीतील उमेदवार पडळकर यांचा सत्कार केला आहे. अर्ज दाखल केल्यानंतर केलेल्या या सत्काराने बारामतीत राजकीय खळबळ उडाली.
पवार आणि काकडे कुटुंबात 1967 पासून राजकीय वैर होते. परंतु हे वैर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी संपवले. काकडे पवार यांच्यातल्या वादाला अजित पवारांनी पूर्णविराम दिला. मात्र आता भाजपचे बारामती विधानसभा निवडणुकीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा सतिश काकडे यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्याने बारामतीत खळबळ उडाली आहे.
बारामती विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून सतीश काकडे यांनी काल स्वाक्षरी केली. त्यानंतर अजित पवार यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर प्रचाराचा नारळ फोडला. मात्र सायंकाळी भाजपाचे बारामती विधानसभेचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा त्यांनी सत्कार केल्याने बारामतीत चर्चेला उधाण आलं.
काकडेंनी केला खुलासा
’परंपरेप्रमाणे अतिथी म्हणून आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले जाते. त्याप्रमाणे गोपीचंद पडळकर हे माझ्या संस्थेत आल्याने मी ते कर्तव्य बजावले आहे. पडळकर हे जरी माझ्या सासरवाडीचे असले तरी, बारामती विधानसभा निवडणुकीत मी राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्यासोबतच राहणार आहे,’ असा खुलासा सतीश काकडे यांनी केला. त्यामुळे राष्ट्रवादीला दिलासा मिळाला आहे.
भाजपकडून थेट काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला जात आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघात रासपचे नेते महादेव जानकर यांना मैदानात उतरवून राज्यभर वातावरण निर्मिती केली होती. धनगर समाजाचे नेते असलेले जानकर तेव्हा विजयापासून दूर राहिले असले तरी त्यांनी सुप्रिया सुळे यांना कडवी झुंज दिली होती.
यंदाच्या निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी भाजपने गोपीचंद पडळकर यांची निवड केली आहे. गोपीचंद पडळकर हेदेखील धनगर समाजाचे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. पवारांना आव्हान देण्यासाठी भाजपकडून धनगर समाजातील नेत्यांना समोर आणण्याचं महत्त्वाचं कारण आहे ते या परिसरातील जातीय समीकरण. बारामती मतदारसंघात मराठा समाजापाठोपाठ धनगर समाजाची मतं आहेत. त्यामुळे धनगर समाजातील मतदारांना चुचकारण्यासाठी भाजपने ही खेळी खेळल्याची चर्चा आहे.