Breaking News

‘पेड न्यूज’संदर्भात प्रशासन कठोर

निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेत वृत्तपत्रांनी आचारसंहितेचा भंग करत एकाच उमेदवारांचे गुणगान करणार्‍या बातम्या प्रसारित केल्याने जिल्हा निवडणूक विभागाने कारवाई करत दोन वृत्तपत्रांच्या  जिल्हा प्रतिनिधींना नोटीस बजावली आहे. या पेड न्यूजचा खर्च संबंधित उमेदवाराच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात येणार आहे.

2009 च्या लोकसभा निवडणुकीनंतर पेड न्यूजचा माध्यमात शिरकाव झाला. उमेदवाराला निवडणूक लढवण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत खर्चावर बंधने आणली गेली. तरीही काही उमेदवार गुपचूप पेड न्यूजच्या माध्यमातून प्रचार करतात.  अशा पद्धतीच्या बातम्या काही वृत्तपत्रांमध्ये आढळल्या आहेत. त्याची तपासणी माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीमार्फत करण्यात आली. त्यामध्ये सदर बातमी पेड न्यूज असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. जिल्हाधिकार्‍यांनी यावर कारवाई करत सदर वृत्तपत्राला नोटीस बजावण्याचे तसेच सदर पेड न्यूजचा खर्च संबंधित उमेदवाराच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्याचे निर्देश दिले आहे. यासंदर्भात कार्यवाही सुरू आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या निर्देशावर तत्काळ अंमलबजावणी झाली असून संबंधित वृत्तपत्रांच्या जिल्हा प्रतिनिधींना नोटीस बजावल्या आहेत. एका वृत्तपत्राने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. सोबतच ज्या उमेदवाराचा पेडन्यूजच्या माध्यमातून प्रचार करण्यात आला. त्या उमेदवाराच्या निवडणूक खर्चात सदर पेडन्यूजचा खर्च समाविष्ट करण्यात आला आहे.

या सोबतच जिल्ह्याच्या निवडणूक विभागाने सर्व वर्तमानपत्रांना ताकीद दिली आहे की, आदर्श आचारसंहितेदरम्यान किंवा अन्यवेळी प्रेस कौन्सिलच्या 30 जुलै 2010 च्या अहवालातील परिच्छेद 5 नुसार वृत्तपत्रांकडून विशिष्ट उमेदवार किंवा पक्षाच्या प्रचाराची अपेक्षा नाही. असे झाल्यास दुसरा उमेदवार किंवा पक्षाला उत्तर देण्याची जबाबदारी येते. वस्तुनिष्ठ वृत्तांकनावर भर हवा. कोणत्याही एकाच उमेदवाराचे गुणगान करणारे तसेच कोणत्याही पक्षाचा प्रसार व प्रचार करणारे वृत्त प्रकाशित करणे. हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे. सर्व वर्तमानपत्राकडून वस्तुनिष्ठ व निपक्ष बातम्यांची अपेक्षा असून पेड न्यूज प्रकाशित करून आचारसंहितेचे उल्लंघन करू नये, अशा सूचना जारी केल्या आहेत.