Breaking News

पतीला जेवणात विष देऊन मारणार्‍या पत्नीला जन्मठेप

औरंगाबाद   
पती विलास दादाराव आव्हाडला वांग्याच्या भाजीतून धोतर्‍याच्या बिया खाऊ घालून त्याचा खून करणार्‍या पत्नी संगीता आव्हाडला जिल्हा व सत्र न्यायधीश डॉ. एम.एस. देशपांडे यांनी जन्मठेप सुनावली. मयतच्या तीन मुलास कायद्याप्रमाणे विधी सेवा प्राधिकरणाने नुकसान भरपाई द्यावी असे आदेशात नमुद केले.

मुकुंदवाडी परिसरातील राजनगरामध्ये विलास आव्हाड आपल्या कुटुंबीयासोबत किरायाच्या घरामध्ये गेल्या आठ ते दहा वर्षापासून राहत होता. 28 मे 2016 रोजी विलासची पत्नी संगीता आणि तिचा मुलगा किशोर हे दोघे विश्रांतीनगरात राहणार्‍या नंणद अनिता भालेरावच्या घरी गेली आणि पती विलास रात्रीपासून घरी आलेच नसल्याचे सांगितल्यामुळे तिने अन्य नातेवाईकांकडे भावाचा शोध घेतला. पोलीस ठाण्यात तक्रार दे असे अनिताने म्हटल्यावर संगीताने त्याकडे दुर्लक्ष करून नणंदेच्या घरातून बाहेर पडली. दरम्यान किशोरची पत्नी 2 जून रोजी सुरेखा हे किनगावराजा, माहेरी गेली. सुरेखाच्या वडिलांनी सुरेखाच्या आजीसासू (विलासची आई) शांताबाईला मोबाईलवर कॉल करून तातडीने किनगावराजाला बोलवून घेतले. सुरेखाने आजी सासूला घडलेली सर्व हकीकत सांगितल्यानंतर त्यांनी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन विलास हरवल्याची तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला.

पोलिसांनी सुरेखाचा जबाब नोंदविला असता तिने सासू संगीता, पती किशोर आणि देवाळाई येथे राहणार्‍या शेख गफार शेख या तिघांनी संगणमत करुन सासरे विलास च्या जेवणामध्ये धोतर्‍याच्या बिया वाटून टाकल्यामुळे विषबाधा झाली. त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत असल्याचे सांगून चिकलठाणा परिसरातील नवपुते वस्तीवरील प्लॉटवर नेऊन पुरले असल्याचे सांगितले. मुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साईनाथ गितेनी घटनास्थळी जाऊन कुजलेला अवस्थेतील मृतदेह बाहेर काढला. अनिता भालेराव च्या तक्रारीवरुन संगीता, किशोर आणि शेख गफार या तिघांविरोधात खूनचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सहायक लोकअभियोक्त राजू पहाडीया यांनी 14 साक्षीदरांचे जबाब नोंदविले असून त्यात सुरेखा, रिक्षाचालक आणि वैद्यकीय अधिकार्‍याची साक्ष महत्वाची ठरली. न्यायलयाने संगीता आव्हाडला दोषी ठरवून भादंवि 302 कलमान्वे जन्मठेप, 5 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साधी शिक्षा, भादंवि 201 कलमान्वे 2 वर्ष सक्तमजूरी, 2 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 2 महिने साधी शिक्षा. किशोरचा खटला बाल न्यायालयात प्रलंबित आहेत तर शेख गफारला सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्त केले. न्यायालयाने विलासच्या तिन मुलांना विधी सेवा प्राधिकरणाने कायद्यानुसार नुकसान भरपाई द्यावी आणि त्याच्या राहण्याची सोय करावी असे आदेशात नमुद केले.