Breaking News

शिखर बँक घोटाळ्यात राष्ट्रवादीच्या रोहित पवारांचाही समावेश : सोमय्या

Kirit Somaiya
नाशिक
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने (शिखर बँक) साखर कारखान्यांसाठी वाटलेल्या कर्जामध्ये हजारो कोटींच्या घोटाळ्यात शरद पवार, अजित पवारांसह रोहित पवारांचेही नाव असल्याचा गंभीर आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी नाशकात केला.नाशकातील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ बुद्धिजीवी घटकांच्या भेटीगाठीसाठी सोमय्या बुधवारी आले असता वसंतस्मृती पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.शिखर बँकेच्या कर्जवाटपाबाबत नाबर्ड, कॅग तसेच तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नेमलेल्या कमिटीने दिलेल्या अहवालात हा हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने संचालक मंडळावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. साखर कारखान्याला कोट्यवधींचे कर्ज द्यायचे, त्यानंतर तो कारखाना आजारी पाडायचा. कर्ज थकल्याने शिखर बँकेने जप्त करायचा आणि त्यानंतर देखाव्यासाठी बोगस लिलावधारक उभे करायचे अन् अल्प किमतीत तो कारखाना खरेदी करायचा अशी व्यूहरचना पवारांनी करत किमया साधली. या सर्व गोष्टी चौकशी अहवालात समोर आलेल्या आहेत. ईडीच्या चौकशीवरूनच शरद पवार व अजित पवार यांच्यात वाद झाल्याने अजित पवारांनी राजीनामा दिल्याचे नाटकही केल्याची टीका त्यांनी केली. शिखर बँक घोटाळ्याप्रमाणेच जलसिंचन घोटाळ्याबाबत लवकरच उच्च न्यायालय गुन्हे दाखल करण्याचे आदेश देईल, असा दावा त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ७० दिवसांच्या आत काश्मीरचे ३७० कलम रद्द केल्याने आगामी विधानसभेत नक्कीच फायदा होणार असून महायुतीच्या २३३ हून अधिक जागा निवडून येतील, असा विश्वासही सोमय्या यांनी या वेळी व्यक्त केला.
राज ठाकरे नेमके काय करतात तेच कळत नाही
बंडखोरांना महायुतीचे नेते समज देतील. मात्र, बंडखोरीचा परिणाम होणार नाही. नाशिकमध्ये भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून येतील. पीएमसी बँक महिनाभरात पुनरुज्जीवित करण्यात येईल. मुख्यमंत्र्यानी अॅक्शन प्लॅन तयार केला आहे. पक्षहितामुळे खासदारकीचे तिकीट कापले. मात्र, पक्षाने अन्य जबाबदारी देऊन विश्वास व्यक्त केला आहे. राज ठाकरे नेमके काय करतात हेच कळत नाही, असेही ते म्हणाले.