Breaking News

राहुल समर्थकांकडून सोनियांचे निकटवर्तीय लक्ष्य

नवी दिल्ली
उमेदवारीवरून नाराज झालेले हरयाणा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक तन्वर यांनी पक्ष सदस्यत्वाचा शनिवारी राजीनामा सादर केला. राहुल गांधी यांनी संधी दिलेल्या तरुण नेत्यांचे पद्धतशीरपणे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करीत तन्वर यांनी पक्षातील सोनियानिष्ठांना लक्ष्य केले आहे.
अशोक तन्वर हे  पाच वर्षे हरयाणा काँग्रेसचे अध्यक्ष होते. निवडणुकीपूर्वी त्यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटविण्यात आले होते. तन्वर यांना हटवावे या मागणीसाठी माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा यांनी पक्ष सोडण्यापर्यंत टोकाची भूमिका घेतली होती. शेवटी सोनिया गांधी यांनी तन्वर यांच्या जागी शैलजा यांची प्रदेशाध्यक्षपदी तर हुडा यांची पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड केली होती. राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाच्या काळात तन्वर यांना बदलण्याची मागणी हुडा यांच्याकडून सातत्याने केली जात होती. पण राहुल यांनी हुडा यांना शह देण्यासाठीच तन्वर यांना अध्यक्षपदावर कायम ठेवले होते.
हरयाणा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्‍चित करताना हुडा यांनी आपल्या समर्थकांना डावलल्याचा आरोप तन्वर यांनी केला. हुडा यांच्या विरोधात दोन दिवसांपूर्वी तन्वर यांनी 10 जनपथ या सोनिया गांधी यांच्या निवासस्थानासमोर निदर्शनेही केली. पक्षाकडून प्रतिसाद मिळत नसल्यानेच शेवटी तन्वर यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा पक्षाध्यक्षांकडे सादर केला. आपल्या चारपानी राजीनामापत्रात तन्वर यांनी सोनिया गांधी यांच्या निकटवर्तीयांना लक्ष्य केले आहे.
‘गेल्या दशकभरात राहुल गांधी यांनी संधी दिलेल्या किंवा पक्षातील पदांवर नियुक्त केलेल्या तरुण नेत्यांचे पद्धतशीरपणे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झाला आहे. या विरोधात आवाज उठविण्याचे धाडस कोणी केले नाही. पण अशा शक्तींचे आपण पितळ उघडे पाडल्याचे तन्वर यांनी पक्षाध्यक्षांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

निरुपम नाराज
 अशोक तन्वर यांच्याबरोबरच मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम हेसुद्धा पक्षातील सोनिया गांधी यांच्या निकटवर्तीयांवर नाराज आहेत. राहुल गांधी यांच्या कार्यकाळात निरुपम यांना मुक्त वाव मिळाला. पण आता पक्षाच्या निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवल्याने नाराज आहेत. तन्वर यांच्याप्रमाणेच निरुपम हेसुद्धा काँग्रेस सोडण्याच्या विचारात आहेत.