Breaking News

सेना- भाजप युतीमधील छुपे राजकारण

शिवसेना आणि भाजप यांची युती झाली आहे. या दोन पक्षांमध्ये कोण मोठा, कोण लहान हा वाद आता मिटला असण्याची शक्यता आहे.  पंतप्रधान मोदींनी मुंबईतील नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा आपला लहान भाऊ असा उल्लेख केला होता, आता हा उल्लेख वयाचा विचार करून केला गेला की राजकीय भूमिकेच्या बाबतीत केला, हा विषय आपण गौण समजू. परंतु मोदी-शहांचे एकूण राजकारण बघता मोदींनी एका तिरातून अनेक साध्य केल्याचे दिसते. 2014 साली गत विधानसभा निवडणुकीपर्यंत राज्यात शिवसेना मोठ्या भावाच्या भूमिकेत वावरत होती आणि भाजपनेही ते कित्येक वर्षे मान्य केले होते, परंतु त्या निवडणुकीत शिवसेनेच्या तुलनेत जवळपास दुप्पट अधिक जागा जिंकत भाजपने राजकारणात बदल होऊ शकतो आणि लहान भाऊ हा मोठा भाऊ होऊ शकतो, हे दाखवून दिले. यापुढे मोठ्या भावाची भूमिका भाजपकडेच राहणार हे  मोदी आणि भाजपच्या नेतृत्वाने निश्‍चित केले. गेल्या पाच वर्षांत शिवसेनेने भाजपच्या नाकी नाऊ आणले होते. एकाच सत्तेत असून शिवसेना भाजपला राज्यात मोठा विरोध करत होती. शेतकरी आंदोलन,कर्जमाफी, नाणार प्रकल्प आदी प्रश्‍नांवर शिवसेनेने विरोधी पक्षांच्या बरोबरीने आंदोलने केली होती. मागच्या वेळी जी चूक केली ती यावेळी न करण्याचे सेनेने ठरविलेले दिसते. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि मोदी सरकारवर त्वेषाने टीका करणार्यां सेनेने लोकसभा निवडणुकीत भाजपची कोंडी करीत आपले बरोबरीचे स्थान पुन्हा प्राप्त केले किंवा तसा प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत विजय प्राप्त करायचाच, आपली सत्ता कायम राखायचीच या जिद्दीने पेटलेल्या भाजप श्रेष्ठींनी म्हणजेच मोदी-शहांनी राजकीय दिशा ओळखून सेनेसोबत राज्यात तडजोड केली. त्याचवेळी सेना नेतृत्वाने राजकीय चलाखी दाखवित पुढच्या विधानसभा निवडणुकीची बोलणी करून घेतली, तसा करारच झाला असे म्हटले जात आहे. विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष समान जागांवर लढतील, असा होरा होता किंवा जागावाटपावरून युती बरखास्त होते की काय अशी शक्यता होती. परंतु शिवसेनेने कमालीचा संयम राखत शिवसेनला कमी जागा घेतल्या आणि भाजपला मोठेपण दिले. ज्या महाराष्ट्रात पूर्वी शिवसेनेचे मोठे वर्चस्व होते, त्यावेळी भाजप हा शिवसेनेच्या पासंगालाही न पुरणारा पक्ष होता. परंतु राजकारणात केव्हाही, काहीही बदल होऊ शकतो. ‘पॉलिटिक्स इज द गेम ऑफ चान्स’ म्हणजेच राजकारण हा नशिबाचा खेळ आहे. तो कोण विजेता होईल, हे नक्की सांगता येत नाही. कारण त्यावेळची सातत्याने बदलणारी राजकीय परिस्थिती हे ठरवत असते.  सध्या भाजपाचे नशीब जोरावर आहे, एवढेच ! शिवसेना आणि भाजपमध्ये नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विधानसभेचे गणित मांडले होते. परंतु राजकीय सद्यस्थिती पाहता शिवसनेने भाजपपुढे माघार घेतली असल्याचे व राजकारणात भाजप हा मोठा भाऊ असल्याचे मान्य केले आहे. शिवसेनचे विधानसभेचे उमेदवार व उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद मिळावे, अशी शिवसेनेची मागणी होती. आदित्य ठाकरे यांना राजकारणात आणण्याचा विचार नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान ठरला आहे. उद्धव ठाकरेंची अलीकडील काळातील वक्तव्ये पाहता, सेनेने आदित्य ठाकरे यांना महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाचे स्थान प्राप्त करून देण्याचे ठरवले आहे. त्यासाठी शिवसेना सबुरीने घेत आहे. प्रत्यक्षात भाजप नेतृत्वाने शिवसेनेला कधीही बरोबरीचे स्थान दिले नाही. केंद्रातील मागच्या आणि या सरकारमध्येही राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील दुसरा सर्वात मोठा पक्ष शिवसेनाच आहे, परंतु या दोन्ही सरकारमध्ये सेनेला मानाचे पान मिळालेले नाही. केंद्रात एका कॅबिनेट मंत्रिपदावर सेनेची बोळवणूक करण्यात आली आणि खातेदेखील महत्वाचे देण्यात आले आहे असे नव्हे ! त्यामुळे या विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेच्या वाट्याला भाजप श्रेष्ठींकडून अपेक्षित मानसन्मान मिळेल असे वाटत नाही. ना. चंद्रकांत दादा यांनी नुकतेच म्हटले होते की, शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देतो असे आम्ही म्हटले नव्हते. दादांच्या या वक्तव्यावर शिवसेनेन कुठलीही टोकाची प्रतिक्रिया दिलेली नाही. भाजपच्या श्रेष्ठींनी महाराष्ट्रातील नेत्यांना बजावून ठेवले होते की, शिवसेनेच्या अटी, शर्ती मान्य करू नका. कुठल्याही अटी, शर्तीशिवाय शिवसेना युतीमध्ये सामील होत असल्यास ठीक आहे, अन्यथा आम्ही वेगळा विचार करू असा अर्थ त्यातून ध्वनित होत होता. अखेर भाजप - शिवसेना  युती झाली. तरीही भाजपने वेगळ्याप्रकारे जागा वाटप करत आपले वर्चस्व राखले आहे. सध्या भाजपकडे जागावाटपात 150 जागा असल्या तरी 14  मित्रपक्ष भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवत आहे. तसेच भाजपने छुप्या पद्धतीने शिवसेनेविरोधात किमान 20 बंडखोरांना बळ दिले आहे. हे पाहता भाजप अप्रत्यक्षपणे 184 जागांवर विधानसभा निवडणूक लढवत असल्याचेच दिसत आहे. म्हणजे जागावाटपात वर्चस्व राखले आणि राजकीय डावपेचातही भाजपने आपल्याला भवितव्यात महत्व मिळेल, अशी रणनीती आखली आहे. यातील 155 जागा भाजपच्या आल्या तर भाजपला कोणाच्या पाठिंब्याची गरज उरणार नाही, असा राजकीय डाव सध्याचे चाललेले भाजपचे राजकारण पाहता दिसत आहे.           भाजपने महाराष्ट्रातील 288 मतदारसंघ महाजनादेश यात्रेद्वारे पिंजून काढले आहेत. संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती घेणे, इतर पक्षातील बड्या नेत्यांना आपल्याकडे घेणे, जिथे आघाडीचे उमेदवार सक्षम आहेत तिथे फोडाफोडीचे राजकारण करणे, शिवसेनच्या उमेदवाराविरोधात भाजपच्या बंडखोरांना बळ पुरवणे आदी राजकीय खेळी भाजपने केव्हाच सुरु केल्या होत्या.  दुसर्‍या पक्षातील महत्वाचे नेते आपल्या गळाला लावण्याच्या स्पर्धेतही भाजपने सेनेला खूप मागे टाकले. भाजपने स्वबळावर लढण्याची तयारी केली होती, परंतु सध्या युती झाली असली तरी भाजपचे राजकीय डावपेच हे स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचे वाटतात. जर वेळ पडली तर शिवसेनेला अटी,शर्तीशिवाय पाठिंबा द्यावा लागेल, अशी भाजपाची मोठी व्यूहरचना आहे. मोदींनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला बजावले आहे की, तुम्ही लहान भाऊ आहात,देऊ त्यात समाधान माना. उद्धव ठाकरेंनी मोदींच्या उपस्थितीत पुढचे सरकार युतीचेच असेल असा आत्मविश्‍वास व्यक्त केला असला तरी भाजप वेगळ्या राजकीय विचारांनी चालला आहे, असे वाटते. युतीचे सरकार स्थापन करण्यास भाजपची हरकत नाही, परंतु स्थापन होणार्‍या सरकारमध्ये सेनेचे स्थान दुय्यम असावे , ही भाजपची अपेक्षा असू शकते. मोदी-शहांचे आत्तापर्यंतचे राजकारण पाहता राज्यांतील प्रादेशिक पक्ष व काँग्रेसचे बळ कमी करणे हाच एक उद्देश दिसतो. अखेर शत- प्रतिशत भाजप ही घोषणा साकार करायची आहे ना ! त्यासाठी असे राजकारण करावेच लागेल.