Breaking News

राजकाकांकडून आदित्यच्या निर्णयाचे स्वागत!

Raj Thakare
मुंबई
 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढत असताना त्यावर आदित्य यांचे काका, म्हणजेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रथमच प्रतिक्रिया देत आदित्य यांच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. आदित्य माझे आशीर्वाद घेण्यासाठी आला नसला तरी आम्ही त्याच्या पाठीशी आहोत, असे राज म्हणाले.
आदित्य ठाकरे यांच्या रूपाने ठाकरे कुटुंबातील एखादी व्यक्ती प्रथमच निवडणूक लढवत आहे. विशेष म्हणजे पुतण्या राजकारणात पहिलं पाऊल ठेवत असताना राज यांनी जाणीवपूर्वक आदित्य यांच्याविरुद्ध उमेदवार दिलेला नाही. यावर उद्धव ठाकरे यांनी आधीच आभार व्यक्त केलं असताना आता राज यांनी आदित्य यांच्या निर्णयाचं उघडपणे समर्थन केलं व उद्या माझा मुलगा निवडणूक लढवायची आहे, असं म्हणाला तर मी त्यालाही नाही म्हणणार नाही, असे राज म्हणाले.
आदित्य निवडणूक लढवत असेल तर त्यात चुकीचं काय?, असे विचारत राज यांनी बाळासाहेबांचा दाखला दिला. बाळासाहेब व्यंगचित्रकार होते. त्यांच्या हाताचं वळण बिघडेल म्हणून आजोबांनी त्यांना जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये पाठवले नाही. पण बाळासाहेबांचं सांगायचं तर मला आणि उद्धवला त्यांनी कधीच रोखले नाही. आमच्यावर त्यांनी काहीही लादले नाही. आमच्या मुलांच्या बाबतीतही तेच आहे. ते एखादा निर्णय घेत असतील तर त्यांना आम्ही रोखणार नाही, असे राज म्हणाले.
आदित्य माझ्याबद्दल काय विचार करतो, मला माहीत नाही. पण माझं म्हणाल तर मी त्याच्याबाबत योग्य भूमिका घेतली आहे. प्रत्येकाचं स्वत:चं एक मत असतं. आदित्यने स्वत:हून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे आणि हे समर्थनीयच आहे, असेही राज म्हणाले.
दरम्यान, सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाने वरळीचा पेपर शिवसेनेसाठी अगदीच सोपा झाला आहे. मनसेने या मतदारसंघात उमेदवार दिला नसल्याने येथे एकतर्फी निवडणूक होत असल्याचे बोलले जात आहे. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे हे मुंबईतील सर्वाधिक मताधिक्य मिळवणारे उमेदवार असतील, अशा शुभेच्छा दिल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर विधानसभेत ठाकरेंच्या आदित्यची दमदार एंट्री होणार, हे निश्‍चित मानले जाऊ लागले आहे.