Breaking News

मनपाने कचरा वेचकांना रेनकोटसह सुका कचरा द्यावा

अहमदनगर/प्रतिनिधी
 “रस्त्यावरील सुका कचरा उचलण्याच्या कामामुळे शहराची स्वच्छता 20 ते 25 टक्के करतात. गोळा केलेला कचरा अंगा-खांद्यावर वाहून त्यांचे वर्गीकरण करुन भंगारमध्ये विकून त्यावर उपजीविका हे कर्मचारी करतात, त्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न विचारात घेऊन मनपाने त्यांना ओळखपत्रासह तोंडाला लावण्याचे  मास्क, बूट, हातमोजे आणि रेनकोट द्यावा, डेपोतून पुनर्चक्रीत कचरा त्यांना दिल्यास तेथील स्वच्छतेचा प्रश्‍न मार्गी लागेल. कचरा निवडण्यासाठी (वर्गीकरण) डेपोत शेड करावे आणि कचरा वेचकांना हंगामी नेमून त्यांच्याकडून ही कार्यवाही करावी’’, अशी मागणी जिल्हा कागद, काच, पत्रा, वेचक कष्टकरी पंचायतीने केली आहे.
1 ते 3 ऑक्टोबर दरम्यान मनपाच्या स्वच्छता अभियानात शहरातील 30-35 कचरा वेचक सहभागी होते, यावेळी स्वच्छतेनंतर डेपोतील सुका कचरा पगारी कर्मचारी, ठेकेदार यांनी हक्क सांगून मनाई केली. वास्तविक कचरा वेचकांना नेमून ही कार्यवाही करावी. शहरातील कचरा वेचून त्यांचे पुनर्चक्रीत करण्यासाठी संबंधितांपर्यंत पोहचविण्याचे त्यांचे काम हे दैनंदिन 10 ते 12 तास होते. झोपडपट्टी अथवा अत्यंत छोट्या जागेत राहणार्‍या या कर्मचार्‍यांच्या आरोग्याचा मोठा प्रश्‍न आहे. एक दिवस सुटी घेतली तर त्या दिवशीचे उत्पन्न बुडते. अल्प उत्पन्नासाठी कष्टाचे काम त्यांना करावे लागते. या पोटी मनपाकडून त्यांना मोबदला मिळत नाही’’ अशी माहिती या संघटनेचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब उडाणशिवे यांनी मनपाच्या ‘स्वच्छता ही सेवा’ या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी दिली. त्यावेळी निवडणूक आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर चर्चा करण्याचे सकारात्मक आश्‍वासन उडाणशिवे यांना प्रशासनाने दिले आहे.
कचरा वेचकांनी मनपाच्या स्वच्छता या मोहिमेत सहभागी होऊन स्वच्छतेमध्ये निघणारे काच, कागद, पत्रा आदी पुनर्चक्रीत कचरा घेऊन जावे, असे लेखी पत्र आरोग्य अधिकार्‍यांनी दिले होते, मात्र प्रत्यक्षात त्याची कार्यवाही झाली नाही. जवळपास 450 कचरा वेचक शहरात कार्यरत आहेत. पहाटे 5 ते स. 10 तर दु.2 ते सायं.6 आणि रात्री 8 ते 10 या वेळेत ते काम करतात.     प्लॅस्टिक बंदीमुळे त्याची विक्री होत नाही. परिणामी कचरा वेचकांच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. मनपाचे ओळखपत्र, मानधनासह सर्व पूर्तता निवडणूक निकालानंतर करावी, अशी अपेक्षा उडणशिवे यांनी व्यक्त केली.