Breaking News

इस्लामबाह्य पद्धतीने दाढी करणार्‍यांस अटक

पेशावर
ग्राहकांची दाढी वेगळ्या  शैलीत करून देऊन इस्लामच्या तत्त्वांचे उल्लंघन केल्याने चार न्हाव्यांना  पाकिस्तानातील खैबर पख्तुनवा प्रांतात अटक करण्यात आली. स्थानिक न्हावी संघाने अशा प्रकारे दाढी कोरून देणे हे इस्लामबाह्य असल्याचे म्हटले आहे.
30 सप्टेंबरला हा प्रकार झाला असून त्याची चित्रफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली. त्यात या न्हाव्यांना तुरुंगात टाकल्याचे दिसून आले आहे,असे ‘दी डॉन’ या वृत्तपत्राने स्पष्ट केले. चित्रफितीत समीन हा न्हावी संघटनेचा अध्यक्ष संबंधित न्हाव्यांवर अटकेची कारवाई केल्यानंतर पोलिसांशी बोलताना दिसत आहे. विशिष्ट पद्धतीने दाढी करण्यावर बंदी असताना इस्लामबाह्य कृत्य का केलेत असे हा पदाधिकारीच न्हाव्यांना विचारत आहे. न्हावी दुकानदार संघटनेने अलीकडेच अशा पद्धतीने  दाढी करण्यावर बंदी घातली होती. आम्ही निर्णय घेऊनही या न्हाव्यांनी वेगळ्या शैलीदार पद्धतीने  दाढी करण्याचे प्रकार केले  अशी विचारणा करण्यात आली. पोलिसांनी त्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये दंड केला आहे. न्हाव्यांना अटक केल्याच्या वृत्ताला पोलिसांनी  दुजोरा दिला आहे. तक्रारींच्या आधारे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली असून न्हावी दुकानदार संघटनेनेच या लोकांविरोधात तक्रार  दाखल केली होती. काही तास डांबून ठेवल्यानंतर या न्हाव्यांची सुटका करण्यात आली, त्यांना दंड केल्याचा पोलिसांनी इन्कार केला आहे.