Breaking News

धरणातील पाण्याचे वाद मिटणार:मुख्यमंत्री फडणवीस

आ. स्नेहलता कोल्हेंच्या प्रचारार्थ कोपरगावात सभा


 कोपरगाव / ता.प्रतिनिधी

 पर्जन्यमान कमी झाले तर नाशिक, नगर, औरंगाबाद जिल्ह्यात धरणाच्या पाण्यावरुन कायम संघर्ष होतात. यासाठी गोदावरी खो-यातील पाण्याची तूट भरुन काढण्यासाठी पश्चिमी वाहीन्यांचे १६८ टीएमसी समुद्रात वाहून जाणारे पाणी वळविण्यात येणार आहे. यासाठीचा आराखडा तयार असून या कामाचे टेंडर लवकरच निघेल. यामुळे जायकवाडीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. यामुळे धरणातील शेती, पिण्याच्या पाण्याचे वाद कायम मिटणार आहेत, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

 कोपरगाव येथिल तहसील मैदानावर भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार आ.स्नेहलता कोल्हे यांच्या प्रचाराप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री शंकरराव कोल्हे, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे, खा.सदाशिव लोखंडे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, संजीवनी एज्युकेशन कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, काका कोयटे, रवीकाका बोरावके, संभाजी दहातोंडे,भाऊसाहेब वाकचौरे, कैलास जाधव, शिवाजी ठाकरे, योगेश बागुल , सनी वाघ, दिलीप दारूनकर,  संजय सातभाई, दीपक गायकवाड, प्रमोद लभडे,सुनील तिवारी, विजय आढाव, जितेंद्र रनशूर, कैलास खैरे,अनिल आव्हाड,सुमित कोल्हे आदींसह मोठ्याप्रमाणावर अधिकारी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 मुख्यमंत्री पुढे म्हणाले की पाच वर्षात प्रामाणिकतेतून पारदर्शक कामे केली जलयुक्त शिवारच्या माध्यमातून  शेतक-यांना शाश्वत सिंचन दिले. शेततळे, विहिरी दिल्या. निळवंडे धरणाच्या कालव्यासाठी निधी उपलब्ध करुन  दिला आहे. या कामांसाठी मंत्री विखे यांनी पाठपुरावा केला. कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडविला. परंतु काहींनी शेतक-यांची दिशाभूल केली. राखीव पाण्यातून कोपरगावला पाणी दिले. शेतक-याच्या कोट्यातील पाणी दिले नाही. यासाठी आमदार कोल्हे यांनी मोठा पाठपुरावा केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या गेल्या १५ वर्षातील आणि भाजपच्या पाच वर्षाच्या काळातील कामांचा आलेख मांडला. यावेळी त्यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली.

आमदार स्नेहलता कोल्हे यावेळी म्हणाल्या, मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील ५० लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी दिली. यात कोपरगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना यांना ३४ कोटींची कर्जमाफी मिळाली. धरणांमधील शेतीच्या पाण्याचे नियोजन केले. निळवंडे धरणातील बंद पाईपलाईनव्दारे पाणी योजनेस मंजुरी दिली. हा ऐतिहासिक निर्णय आहे. यातून कोपरगाव शहराचा पिण्याच्या पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे. याशिवाय बसस्थानक, नगरपालिका, पंचायत समिती, पोलीस वसाहत, वाचनालय इमारतीसाठी निधी दिला. मतदारसंघातील प्रलंबित पाणी योजनांसाठी २६ कोटींचा निधी दिला. पुणतांब्याचा अनेक वर्षापासूनचा प्रलंबित पाणी प्रश्न मार्गी लावला. त्यासाठी १६ कोेटींचा निधी दिला. वारी पाणी योजनेला १७ कोटींचा निधी दिला.

 यावेळी राधाकृष्ण विखे म्हणाले की , राज्याच्या व सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याची क्षमता असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आहेत. कोणती गोष्ट राज्याचे हिताची करताना पक्षीय राजकारण या पलीकडे जाऊन राज्याच्या जनतेच्या जीवनात आपल्याला बदल करता आला पाहिजे, ही भूमिका मुख्यमंत्र्यांच्या मनात होती. दुष्काळ मुक्त महाराष्ट्र ही साधीसुधी घोषणा नाही. यासाठी फार मोठे धाडस लागते. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. एक नवी भूमिका, एक विकासाची भूमिका घेऊन आपल्या आमदार स्नेहलता कोल्हे निघाल्या आहेत. विलक्षण धडपड त्यांच्या मध्ये मला पाहायला मिळते असेही ते शेवटी म्हणाले.

 कोपरगाव: येथिल तहसील मैदानावर भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार आ.स्नेहलता कोल्हे यांच्या प्रचारार्थ सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस