Breaking News

मुळा धरणाच्या पाण्यावर बीडचा हक्क नाही: राऊत

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी

 बीड शहरापासून जायकवाडी धारण ८५ कि.मी अंतरावर आहे. तर मुळा धरणापासून बीडचे अंतर १७५ कि.मी आहे. मग बीड शहरास मुळा धरणातून पाणी पुरवठा कोणत्या तर्काच्या आधारे करण्याचा आग्रह आहे. जायकवाडी धरणाचा मृत पाण्याचा साठा हा मुळा.धरणाच्या पूर्ण साठयाइतका आहे. त्या मृतसाठ्यातच पूर्ण मराठवाड्याची तहान ५ वर्षे भागेल इतकी क्षमता जायकवाडी धरणात आहे. त्यामुळे मुळा धरणाच्या पाण्यावर बीडचा हक्क नाही असे प्रतिपादन प्रा. सतीश राऊत यांनी केला आहे.

 प्रा.राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले, समन्यायी पाणी वाटपानुसार जर पाऊस कमी झाला व जायकवाडी धरणात पुरेसे पाणी आले नाही. तर त्यावर्षी मुळा, भंडारदरा, गंगापूर, दारणा, व जायकवाडी या धरणातील पाणी साठ्याचा ३० ऑक्टोबर रोजी आढावा घेऊन सर्व धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश होतात. त्यानुसार कार्यवाही होताना सर्व पाहतात. मग त्यानुसार गरजा लक्षात घेऊन मराठवाड्यास सर्व धरणातून पाणी पुरवठा केल्यानंतर पुन्हा शिल्लक राहीलेल्या मुळा धरणाच्या पाण्यावर बीडचा हक्क न्यायवर्धक होतो असा प्रश्न आहे. कोणाच्यातरी काही विकृत स्वार्थासाठी मुळा धरण परिसर व राहुरी तालुका उध्वस्त करण्याचे षडयंत्र तर रचले जात नाही ना अशी शंका येते, असा आरोप राऊत यांनी केला.