Breaking News

नगर स्वीप समितीचा उपक्रम देशाला व राज्याला अनुकरणीय

अहमदनगर/प्रतिनिधी
 “स्वीपच्या मतदार जनजागृती उपक्रमांना देशभक्तीचा सुगंध असला पाहिजे, या माध्यमातूनच भारतीय मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. भारत निवडणूक आयोगाने स्वीपच्या विविधांगी व नाविन्यपूर्ण उपक्रमांवर सतत भर दिला आहे. नगर स्वीप समितीचे नाविन्यपूर्ण व नवसंकल्पना असलेले उपक्रम हे निश्‍चितच  देशाला व राज्याला अनुकरणीय आहेत. यातील काही उपक्रम देश व राज्यस्तरावर राबवण्याबाबत आम्ही विचाराधीन आहोत’’, असे प्रतिपादन भारत निवडणूक आयोगाचे सचिव एस. के. मिश्रा यांनी केले.
भारत निवडणूक आयोगाच्या वतीने यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे येथे स्वीप व रेडिओ कम्युनिटी प्रशिक्षण कार्यशाळेत समारोपप्रसंगी मिश्रा बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भारत निवडणूक आयोगाचे उपसचिव सुजीत कुमार मिश्रा, वरिष्ठ निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा, उपायुक्त चंद्र भूषण कुमार,  राज्य निवडणूक आयोगाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शिंदे, विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर, अर्चना कपूर, नगरचे स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी दिलीप थोरे आदी उपस्थित होते.
सुमारे 26 जिल्ह्यांमधून फक्त नगर जिल्ह्याला आपले स्वीप उपक्रम मांडण्याची संधी या कार्यशाळेत मिळाली. थोरे यांनी नगर स्वीप समितीचे सुमारे 25 वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम भारत निवडणूक आयोगाच्या व राज्य निवडणूक आयोगाच्या महत्वाच्या अधिकार्‍यांसमोर प्रस्तुत केले. राज्यभरातून आलेल्या स्वीप नोडल अधिकारी व रेडिओ कम्युनिटीच्या प्रतिनिधींना नगरचे अनुकरण करण्याचे आवाहन आयोगाच्या अधिकार्‍यांना केले. यावेळी थोरे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. नगर जिल्हा मतदारदूत डॉ. अमोल बागूल यांनी उपक्रमांची पी.पी.टी. प्रस्तुत केली. स्वीप म्हणजे मतदार जनजागृतीचा सिस्टिमॅटिक वोटर एज्युकेशन अ‍ॅण्ड इलेक्ट्रॉल पार्टिसिपेशन प्रोग्रॅम होय.