Breaking News

‘पेमराज सारडा’मध्ये वाचन प्रेरणा दिन

अहमदनगर /प्रतिनिधी
येथील पेमराज सारडा महाविद्यालयातील ज्ञानस्रोत केंद्रात डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस माजी प्राचार्य डॉ. एस.आर.मेढे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण  करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. मेढे, ग्रंथपाल डॉ.राजेंद्र मारवाडे, सुजय रामदासी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रा.मेढे म्हणाले, “वाचनामुळेच डॉ.कलाम यांची जडणघडण झाली असून ते एक चिंतनशील विचारवंत, वैज्ञानिक, शिक्षक व राष्ट्रपती अशा वेगवेगळ्या भूमिकांमध्ये त्यांनी देशासाठी काम केले आहे. त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू दिसून येतात. आयुष्यात रामेश्‍वरच्या सार तीरापासून ते राष्ट्रपती भवनापर्यंत त्यांनी केलेला त्याग, संघर्ष आणि जिद्द याबाबतची त्यांची जीवनयात्रा आजच्या तरुण वर्गासाठी निश्‍चितच मार्गदर्शक, स्फुर्तीदायी आणि प्रेरक ठरेल, असा आत्मविश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
ग्रंथपाल डॉ.राजेंद्र मारवाडे यांनी प्रास्तविकातून वाचन संस्कृतीचे महत्व पटवून दिले तर सुजय रामदासी यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ज्ञानस्त्रोत केंद्रातील सर्वांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.