Breaking News

मतदार जनजागृती अभियानात विविध उपक्रमांचा समावेश

शेवगाव/प्रतिनिधी
शेवगाव विधानसभा निवडणुकीसाठी मतदार जनजागृती मोहिम तालुक्यातील विविध शाळा-महाविद्यालयामध्ये राबविण्यात येत आहे. मतदानाचे संकल्पपत्र, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, मानवी साखळी, पथनाट्य असे विविध उपक्रमांचा मतदार जनजागृती अभियानात समावेश आहे.
या कार्यक्रमाचे नियोजन मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी देवदत्त केकान, तहसीलदार डॉ. विनोद भामरे, नामदेव पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी शैलजा राऊळ यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे. या प्रबोधन कार्यक्रमाची माहिती घेऊन मतदार संघाचे मुख्य निवडणूक निरीक्षक डॉ. सुरेशचंद्र दलाई यांनी समाधान व्यक्त केले.
आबासाहेब कनिष्ठ महाविद्यालयात मतदार जनजागृती अभियानातंर्गत आयोजित केलेल्या रांगोळी स्पर्धेत 50 विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेतील पहिल्या चार क्रमाकांच्या स्पर्धकांचा सन्मान करण्यात आला. स्पर्धेसाठी प्रा.रूपा खेडकर, प्रा. वंदना पुजारी, प्रा.सविता पवार यांनी परिश्रम घेतले. तसेच तहसील कार्यालय आणि बाळासाहेब भारदे हायस्कूलच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने शेवगावच्या आंबेडकर चौक, शिवाजी चौक व तहसील कार्यालय आवारात मतदार जागृतीसाठी व्होट फॉर इंडिया हे पथनाट्य सादर करण्यात आले. हातगाव व मुंगी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांत रांगोळी, चित्रकला व निबंध स्पर्धा घेण्यात आल्या. समृद्ध लोकशाहीसाठी स्वाभिमानाने आणि निर्भीडपणे कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करण्याचा संदेश मतदार जनजागृती अभियानाने देण्यात येत असल्याचे केकाण यांनी सांगीतले.