Breaking News

मायगाव देवी ग्रामस्थांचा निवडणूकीवर बहिष्कार

कोपरगाव/प्रतिनिधी
कोपरगावात आपण गत पाच वर्षात साडेतीनशे कोटी रुपयांचा विकास निधी आणून तालुक्याचा चेहरा-मोहरा बदलून टाकला म्हणणार्‍या विद्यमान सत्ताधार्‍यांना मायगाव देवी मतदारांनी, सत्तर वर्षात आपल्याला साधा रस्ता तयार करून मिळाला नाही. गावात साधी परिवहन मंडळाची बस येत नसल्याने मुलामुलींना शिक्षणापासून व आरोग्यसेवेपासून वंचित राहावे लागत आहे. एकवीस ऑक्टोबर रोजी संपन्न होणार्‍या निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचे निवेदन मायगाव देवी ग्रामस्थांनी दिल्यामुळे कोपरगाव तालुक्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
तालुक्यात सत्तेवर आल्यावर नेत्यांनी तालुक्यात काय दिवे लावले हे वारंवार स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था तर विचारायला नको. मायगाव देवी या गावात स्वातंत्र्य मिळून जवळपास सत्तरी ओलांडून देखील ग्रामस्थांना गावात जाण्यासाठी रस्तेच नसल्याचा आरोप केला आहे. परिणामी ग्रामस्थांना तालुक्याला जाण्यासाठी मोठ्या यातना सहन कराव्या  लागतात. मुलामुलींना शाळा महाविद्यालयांत उच्च शिक्षणासाठी जाता येत नाही. आरोग्य सुविधा गावात उपलब्ध नसल्याने तालुक्यात उपचारासाठी जाताना रस्त्यात केवळ चिखलाचे साम्राज्य असल्याने नको ती आपत्ती नागरिकांवर व महिलांवर येत आहे. व तालुक्याचा लोकप्रतीनिधी मात्र, महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरण्याच्या कोरड्या घोषणा करत असल्या तरी यानिमित्ताने सत्य समोर आले आहे.
या बाबत वारंवार लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करूनही ग्रामस्थांच्या नशीबी व्यथाच आली आहे. त्यामुळे या व्यवस्थेवरील आमचा विश्‍वास उडाल्याने आम्ही अखेर एकत्र येऊन ग्रामस्थांनी येत्या 21 ऑक्टोबर रोजी संपन्न होणार्‍या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला असल्याचे ग्रामस्थांनी कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे याना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर काकासाहेब खर्डे, अशोक कदम, संदीप जगताप, अण्णासाहेब गाडे, साहेबराव नाजगड, संजय साबळे, दिलीप कासार, दिनकर साबळे, राजेंद्र नाजगड, मच्छीन्द्र गाडे, भाऊसाहेब भवर, माधव नाजगड, शैलेश भुसारे, अशोक गाडे, दौलतराव गाडे आदीं प्रमुख मान्यवरांसह 65 ग्रामस्थांनी सह्या केल्याने सत्ताधारी गटाला ऐन निवडणुकीत घाम फुटला आहे.