Breaking News

बदल घडविण्यासाठी जनताच एकवटली: माजी आ.काळे

 कोपरगाव/प्रतिनिधी

  कोपरगाव विधानसभा मतदार संघातील जिरायती भागातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न मार्गी लागावा यासाठी माझ्या कार्यकाळात विरोधी पक्षाचा आमदार असतानाही बंद पडलेली उजनी उपसा जलसिंचन योजना सुरु केली. मात्र मागील पाच वर्षात या योजनेकडे तालुक्याच्या आमदारांनी डोळेझाक केल्यामुळे हि योजना बंद पडली. मागील वर्षी कोपरगाव तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असूनही या भागातील शेतकऱ्यांना आपला हक्क मिळावा यासाठी जिवंतपणी सरणावर बसण्याची वेळ हि तालुक्याच्या असंवेदनशील आमदारांमुळे आली त्यामुळे तालुक्याच्या जनतेची सहनशीलता आता संपली असून जनताच बदल घडवून आणण्यासाठी एकवटली असल्याची प्रतिक्रिया मा. आ. अशोकराव काळे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलतांना दिली.

  कोपरगाव विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ बहादरपूर, रांजणगाव-देशमुख, काकडी आदी गावांमध्ये प्रचार फेरी काढण्यात आली यावेळी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधला या प्रसंगी मा. आ. अशोकराव काळे बोलत होते.

   ते पुढे म्हणाले की, उजनी उपसा जलसिंचन योजना न परवडणारी आहे असे सांगून ३५ वर्ष सत्ता भोगणाऱ्यांनी हि योजना गुंडाळून ठेवत ११ गावातील जनतेला पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्यापासून वंचित ठेवले. २००४ ला जनतेने मला सेवा करण्याची संधी दिली त्यावेळी मी उजनी उपसा जलसिंचन योजना सुरु केली. २०१४ पर्यंत ही योजना चांगल्या प्रकारे कार्यान्वित होती. मात्र मागील पाच वर्षापासून तालुक्याच्या आमदारांनी या योजनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही योजना बंद पडली असून या ११ गावातील नागरिक  पाण्यापासून वंचित राहिले आहे. मागील दोन महिन्यापासून कालवे सुरु आहेत. आज जर हि योजना सुरु असती तर या भागातील नागरिकांच्या पिण्याच्या व सिंचनाचा प्रश्न नक्कीच सुटला असता परंतु सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांची जाणीव नसलेल्या तालुक्याच्या आमदारांनी या योजनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे ही योजना बंद पडली व या भागातील जनता पाण्यापासून वंचित राहिली याला तालुक्याच्या आमदार जबाबदार आहे.  कोपरगाव मतदार संघातील जनता त्रासलेली असून २१ तारखेला परिवर्तन करण्याचा मतदार संघातील सुज्ञ मतदारांनी निश्चय केला असल्याचे मा. आ. अशोकराव काळे यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.