Breaking News

भाजपच्या वळचणीला अस्तनितील निखारे !

संस्थानिकांना असलेली सत्तेची हाव, सत्तेसाठी राजकीय बदफैली करण्याची त्यांची खुबी भाजपाने ओळखून त्यांना लालसा उत्पन्न केली आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात मोहीते घराणे असेल, मराठवाड्यात पाटील असतील,उत्तर महाराष्ट्रात विखे पिचड असतील ही सारी सत्तेच्या रक्ताला चटावलेली राजकीय गिधाडं आहेत. स्वतःचे पाचपन्नास वर्षाचे पाप लपविण्यासाठी या मंडळींनी भाजपची नव्हे तर सत्तेची कास धरली आहेविरोधकांना संपविण्याच्या नादात अस्तनीतील निखारे वळचणीला बांधून वेगाने निघाले आहेत. एक दिवस हेच निखारे वळचण पेटून सत्तेच्या खुर्चीला आग लावल्याशिवाय राहणार नाहीत.
कुणाच्या तरी डोक्यावर पाय ठेवून पायरी चढल्यानंतर ते डोकच उडवायचा कृतघ्नपणा आत्मनाशास कारणीभूत ठरतो.ही बाब राजकारणात यान वेगाने  सुटलेल्या भारतीय जनता पक्षाला कुणीतरी सांगण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. यशाची नशा चढून तोल सुटल्याप्रमाणे या सत्ताधारी पक्षाचे नेतृत्व व्यवहार करीत आहे.देशाच्या राजकारणात एकेकाळी जनतेने नाकारलेला हा पक्ष आज देश बापजाद्याची जहागीर असल्यागत व्यवस्थेला वागवित आहे. सत्तेचा माज दाखवून अवघे समाजकारण राजकारण या पक्षाने वेठीस धरले आहे. फक्त कमळ एके कमळ बाकी वळवळ बंद हे धोरण राबवून व्यक्तीस्वातंत्र्य मारले जात आहे.राजकारणातील विरोध संपवाण्यासाठी ज्यांनी या पक्षाला चांगले दिवस दाखविले  त्या मिञांनाच राजकारणातून हद्दपार करण्याचा सपाटा लावला आहे. भारतीय जनता पक्षाला सत्तेतून आलेली ही नशा एव्हढी भयाण चढली आहे की, विरोधकांना संपविण्याच्या नादात अस्तनीतील निखारे वळचणीला बांधून वेगाने निघाले आहेत. एक दिवस हेच निखारे वळचण पेटून सत्तेच्या खुर्चीला आग लावाल्याशिवाय राहणार नाहीत.राजकारणात प्रबळ शञुला नामोहरम करण्यासाठी त्याचा समांतर शत्रू उभा करावा लागतो.या समांतर शञूला बळ देऊन मुख्य शञूचा नायनाट केला जातो. काँग्रेसनेही महाराष्ट्रात विशेषतः मुंबई शहरात प्राबल्य असलेल्या दत्ता सामंत आणि डाव्या विचारसरणीच्या पक्षांना संपविण्यासाठी शिवसेनेला बळ दिले.शिवसेनेच्या माध्यमातून काँग्रेसला जे हवं होतं ते मिळालं. काँग्रेसची तत्कालीन गरज पुर्ण झाली हे खरे असले तरी एका शञूला संंपविण्यासाठी कळत न कळत काँग्रेसने दिलेले बळ शिवसेनेला महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष बनविण्यास कारणीभूत ठरले.आणि काळाच्या प्रवाहात शिवसेनेने काँग्रेसलाच आव्हान दिले.
या काळात देशपातळीवर काँग्रेसला मात देण्यासाठी भारतीय जनता पक्षाला काँग्रेसशी राजकीय मतभेद असलेल्या विचारांची गरज होती. राष्ट्रीय पातळीवर ताकद असलेले असे  नेतृत्व भाजपा परवडणारे नव्हते. प्रादेशिक पातळीवर शोध घेऊन काँग्रेसच्या स्थानिक विरोधकांशी हातमिळवणी करून राष्ट्रीय लोकशाही आघाडी निर्माण केली. तीस वर्षापुर्वी बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांच्या पुढाकारातून महाराष्ट्रात शिवसेना भाजपा एकत्र आले. तेंव्हापासून आजपर्यंत  महाराष्ट्रात शिवसेनेने काँग्रेस या राजकीय शञूला मात देण्यासाठी भाजपाला बळ दिले. भाजपाची राजकीय गरज शिवसेनेने पुर्ण केली. भाजप मोठा झाला आणि शिवसेना आज हतबल बनली आहे. शिवसेनेसोबत भाजपाला महाराष्ट्राच्या राजकारणात बळ देणारे छोटे मोठे अनेक घटक आहेत.त्या सर्वांचे राजकीय श्राध्द घालण्याचि कार्यक्रम भाजपाने हाती घेतला आहे. राजू शेट्टी यांच्या स्वाभीमानी शेतकरी संघटनेनंतर महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या वाट्यालाही अशीच राजकीय हेळसांड आली आहे. भारतीय जनता पक्षाला आपले अस्तित्व प्रबळ करण्यासाठी सामर्थहीन मिञ हवे आहेत. सत्तेभोवाती पिंगा घालणारे नेते हवे आहेत. स्वाभीमान गहाण ठेवणारे पुढारी हवे आहेत. म्हणूनच जानकरांसारखे ताठ कणा असलेल्या नेत्यांना खच्ची करण्याचा धुर्तपणा सुरू आहे.महादेव जानकरांचा हा स्वाभिमानी बाणा भाजपला खटकलाच असणार. म्हणून रासपच्या विद्यमान आमदाराच्या पत्नीला तिकीट देऊन कमळ चिन्हावर लढवले. कमळ घ्या कमळ करणार्‍यांचा बारामतीत दारुण पराभव झाला. एव्हढ सारं घडून गेल्यानंतरही जानकरांनी संमंजसपणा दाखवला.  विधान सभेत सन्मापूर्वक जागा देण्याची कबुली देणारे वेळ आल्यावर बदलले. पुन्हा कमळावर लढण्याचा आग्रह धरला. सत्तेच्या लालसेपोटी विरोधी पक्षातील दलबदलू नेत्यांनी भाजप मध्ये प्रवेश केला. आता भाजपला गरजेच्या वेळी साथ देणार्‍या मित्र पक्षांची गरज राहिली नाही.
राष्ट्रीय समाज पक्षाचा वाढता प्रभाव आणि त्यातून होणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन जानकारांचा अश्‍व रोखण्याचा कावा केला. विधानसभेला केवळ दोन जागा त्याही कमळाच्या चिन्हावर.एकुणच सत्ता मिळवण्यासाठी भाजपाने ज्यांचा ज्यांचा वापर केला त्या सर्वांना संपविण्याचे कारस्थान आता सुरू झाले आहे.भारतभर पंख पसरले गेल्याने मिञ म्हणून राजकीय पक्षांची गरज संपली आहे. आता महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रावादीच्या काळात ठिकठिकाणी निर्माण झालेले संस्थानिक गळाला लावण्यास भाजपाने सुरूवात केली आहे. या संस्थानिकांना असलेली सत्तेची हाव, सत्तेसाठी राजकीय बदफैली करण्याची त्यांची खुबी भाजपाने ओळखून त्यांना लालसा उत्पन्न केली आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात मोहीते घराणे असेल,मराठवाड्यात पाटील असतील, उत्तर महाराष्ट्रात विखे पिचड असतील ही सारी सत्तेच्या रक्ताला चटावलेली राजकीय गिधाडं आहेत. स्वतःचे पाचपन्नास वर्षाचे पाप लपविण्यासाठी या मंडळींनी भाजपची नव्हे तर सत्तेची कास धरली आहे. कुणावर गंभीर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. कुणावर वादग्रस्त दहशतवादी सदृश्य संस्थांकडून देणग्या  घेतल्याचा आरोप आहे.कुणाच्या सहकारी संस्थाचा भ्रष्टाचार ऐरणीवर आहे.तर कुणी मंञीपदाचा गैरावापर करून जातीचे प्रमाणपञच बनावट तयार करून घेतले आहेत. या दुष्कर्माला संरक्षण मिळावे म्हणून त्यांनी मातृपितृद्रोह केला आहे. भाजपवर त्यांचे प्रेम आहे असे मुळीच नाही. सत्तेवर पिरती जडलेले सत्तांध कावळे उद्या संधी मिळताच भाजपालाही टोच्या मारून  सत्तेच्या अन्य कुणा फांदीवर बसतील.थोडक्यात भाजपाने आपल्या वळचणीला बांधलेले हे अस्तनितील निखारेच भाजपाच्या सत्तेला वणवा बनविण्यास कारणीभूत ठरतील.