Breaking News

राहुल गांधी भारतात परतले, दोन खटल्यांसाठी कोर्टात राहणार उपस्थित

Rahul Gandhi
नवी दिल्ली
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी कंबोडीया दौर्‍यावरून भारतात परतले आहेत. आज आणि उद्या गुजरातमध्ये दोन खटल्यांसाठी ते सुरत आणि अहमदाबादच्या न्यायालयात हजेरी लावणार आहेत. त्यानंतर ते काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. 13 ऑक्टोबरला राहुल गाँधी मुंबईत प्रचारासाठी येणार आहेत. महाराष्ट्र आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राहुल गांधीनी आतापर्यंत प्रचारात सक्रीय होणं अपेक्षित होतं. पण ते परदेशात गेले होते. यावरून विरोधकांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती. येवढंच नाही तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनीही त्यांच्यावर आरोप केले होते.

लोकसभा निवडणुकांमधल्या पराभवाचं चिंतन करण्यापेक्षा राहुल नेते आणि कार्यकर्त्यांपासून दूर झाले. त्यामुळं काँग्रेसला फटका बसल्याचा आरोप खुर्शीद यांनी केला होता.

महाराष्ट्र आणि हरियाणात विधानसभा निवडणुका होणार आहेत. सर्वच पक्ष जोरदार प्रचार करत आहेत. भाजपचे अनेक दिग्गज नेते महाराष्ट्र आणि हरियाणात सभा, रोड शो करणार आहेत. पण अशावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी हे परदेशात गेल्यामुळे त्यांच्यावर टीका होत होती. सगळे पक्ष कामाला लागले असताना काँग्रेसमध्ये मात्र थंड वातावरण आहे. कार्यकर्ते देखील संभ्रमात आहेत. आता राहुल गांधी भारतात परतले असले तरी ते किती सभा घेणार याबाबत अजून कोणतीही माहिती पक्षाकडून देण्यात आलेली नाही.

लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष असलेले राहुल गांधी यांनी देशभरात जोरदार प्रचारसभा घेतल्या. पण पराभवामुळे त्यांना अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता अध्यक्ष कोणाला करायचं असा प्रश्‍न पक्षापुढे होता. पण पुन्हा एकदा सोनिया गांधी यांच्याकडे नेतृत्व देण्यात आलं.

काँग्रेसचे अनेक बडे नेते हे पक्ष सोडून गेले आहेत. त्यामुळे पक्षापुढे मोठा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. राज्यात कोण नेतृत्व करणार असा प्रश्‍न देखील कार्यकर्त्यांपुढे आहे. राहुल गांधी यांच्या जवळचे नेते देखील त्यांच्या या कामगिरीमुळे नाखुश असल्याचं कळतं आहे.