Breaking News

मी टू ला पाठिंबा देणार्‍या अभिनेत्यावरच लैंगिक अत्याचाराचे आरोप

मुंबई/प्रतिनिधी
ऑस्कर पुरस्कार विजेते रॉबर्ट डिनेरो हे हॉलिवूड सिनेसृष्टीतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. महिलांच्या लैंगिक शोषणाविरोधात सुरु असलेल्या मी टू या चळवळीला त्यांनी जाहिर पाठिंबा  दिला होता. परंतु आश्‍चर्याची बाब म्हणजे स्रियांच्या लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवणार्‍या 76 वर्षीय रॉबर्ट यांच्यावरच आता लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आला आहे.
रॉबर्ट डिनेरो यांच्या कंपनीत काम करणार्‍या ग्रॅहम चेस रॉबिन्सन या महिलेने त्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप केले आहेत. 37 वर्षीय ग्रॅहम त्यांच्या कंपनीत त्यांची सहाय्यक म्हणून काम करत होती. तिने रॉबर्ट  यांच्या विरोधात तब्बल एक कोटी 20 लाख अमेरिकी डॉलर्सचा खटला दाखल केला आहे.
रॉबर्ट यांनी अनेकदा माझा लैंगिक छळ केला आहे. ते माझ्याशी अश्‍लील भाषेत संभाषण करायचे. सातत्याने होणार्‍या या मानसिक आणि शारीरिक छळाला मी कंटाळले होते. परिणामी मी त्यांच्या विरोधात आवाज  उठवला, परंतु पैशांच्या जोरावर त्यांनी माझा आवाज दडपून टाकण्याचा प्रयत्न केला, असा आरोप ग्रॅहम यांनी रॉबर्ट डिनेरो यांच्या विरोधात केला आहे.
दरम्यान, रॉबर्ट डिनेरो यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मी कधीही तिचा लैंगिक छळ केला नव्हता. ती एक लालची प्रवृत्तीची स्त्री आहे. आफिसमध्ये असताना कामाच्या वेळात नेटफ्लिक्सवर चित्रपट पाहात  बसायची. त्यामुळे तिला मी कामावरुन काढून टाकले होते. कामावरुन काढल्याचा सूड घेण्यासाठीच तिने माझ्यावर आरोप केले आहेत, असे स्पष्टीकरण रॉबर्ट डिनेरो यांनी दिले आहे.