Breaking News

मी पाकिस्तान समर्थक तर पद्म विभूषण का दिला?’ शरद पवार

मुंबई
राज्यातील विधानसभा निवडणुका प्रचार सुरुवात झाली असून राजकीय सभांमधून प्रत्येक नेता विरोधी पक्षावर टीका करण्याची संधी सोडताना दिसत नाही. अशातच गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अधिक सक्रीय झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पवारांवर पाकिस्तानचे कौतुक करत असल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपानंतर राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांनी मोदींवर जोरदार टीका केली होती. आता मोदींच्या त्या वक्तव्याचा पवारांनी त्यांच्या खास शैलीत समाचार घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणता की मी पाकिस्तानचा समर्थक आहे. असे असेल तर मला देशातील दुसर्‍या क्रमांकाचा पद्म विभूषण या सन्मान कशाला दिला. मोदींना पंतप्रधान कार्यालयाची प्रतिष्ठा राखता आली नाही. पंतप्रधान ही एक संस्था आहे. या संस्थेकडे माहिती मिळवण्याचे अनेक मार्ग असतात. त्यांनी माझे वाक्य नीट ऐकून स्वत:चे वक्तव्य केले असते तर मला आनंद झाला असता इतक नव्हे तर त्यांनी हा विचार करायला हवा होता की, मला जर पाकिस्तान आवडत असता तर त्यांच्या सरकारने मला पद्म विभूषण सन्मानाने का गौरविले. या सन्मानाचा अर्थ असाच आहे की मी देशहितासाठी काही तरी काम केले आहे. पण एका बाजूला सन्मान करायचा आणि दुसर्‍या बाजूला असे सांगायचे की मला पाकिस्तान आवडतो. अशा पद्धतीचा दुतोडी व्यवहार देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीला शोभत नाही, असे पवार म्हणाले.

काय म्हणाले मोदी

नाशिक येथे भाजपच्या महाजनादेश यात्राच्या समारोप सभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी पवारांवर जोरदार हल्ला चढवला होता. जम्मू-काश्मीर संदर्भात असो की पाकिस्तान बाबत काँग्रेसचा गोंधळ मी समजू शकतो. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील शेजारचा (पाकिस्तान) देश चांगला वाटतो. त्यांना तिथले शासक चांगले वाटतात. दहशतवाद्यांची निर्मिती करणारा देश पवारांना चांगला वाटतो हे दुर्दैवी आहे, असे मोदी म्हणाले होते.

पवारांनी दिले उत्तर

एखाद्या गोष्टीची सत्यता न तपासता वक्तव्य करणे पंतप्रधानपदावरील व्यक्तीला शोभत नाही. पाकिस्तान संदर्भात केलेल्या वक्तव्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, भारताविरुद्ध बोलने हेच पाकिस्तानमधील सत्ताधारी आणि लष्करचे धोरण आहे. या धोरणामुळे पाकिस्तानच्या सर्वसामान्य लोकांचे हित साधत नाही. पण त्या देशातील सत्ताधार्‍यांचे हित साध्य होते. मी केलेले वक्तव्य असे होते. माझ्या या वाक्यामुळे पाकिस्तानला कशा प्रकारे मदत झाली? एका पंतप्रधानपदावरील व्यक्तीने अशा प्रकारे वक्तव्य करावे का?, असा सवाल त्यांनी विचारला.