Breaking News

हिंदू महासभेचे कमलेश तिवारी यांची हत्या

Kamlesh Tiwari
लखनऊ 
हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची लखनऊ या ठिकाणी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.  लखनऊ नाका भागात कमलेश तिवारी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. कमलेश तिवारी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र ट्रॉमा सेंटरमध्येच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर गोळीबार करणारे हल्लेखोर फरार झाले आहेत.
मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत कमलेश तिवारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ज्यानंतर त्यांच्याविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली होती. ज्यानंतर लखनऊ भागातली दुकानंही बंद करण्यात आली होती. आता कमलेश तिवारी यांची हत्या करण्यात आल्यानंतरही लखनऊमध्ये तणाव आहे. बाजारपेठेतील सगळी दुकानं बंद करण्यात आली आहेत.
कमलेश तिवारी यांच्यावर गोळी चालवणारे हल्लेखोर बाईकवरुन आले होते. याप्रकरणी पोलिसांवरही निष्काळजीपणाचा आरोप केला जातो आहे. कारण कमलेश तिवारी यांचा नोकर अर्धा तास 100 हा नंबर डायल करत होता, मात्र फोन लागला नाही. घटना घडल्यावर अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळाने पोलीस पोहचले असेही तिवारी यांच्या नोकराने सांगितले.
कमलेश तिवारी यांच्या कार्यालयाजवळ तीन अज्ञात एका गाडीवर आले होते. कमलेश तिवारी यांना भेटवस्तू देण्याच्या निमित्ताने ते त्यांच्या कार्यालयात शिरले. तिथे त्यांनी कमलेश तिवारींवर गोळी झाडली आणि पळ काढला. तिवारी रक्ताच्या थारोळ्यात होते, त्यांना तातडीने ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले मात्र तिथेच त्यांचा मृत्यू झाला.