Breaking News

लिंबू-मिरचीचं काँग्रेसी राजकारण

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशात जवळपास 60 वर्षे काँग्रेसने राज्य केले. सत्ताकारणाचा प्रदीर्घ अनुभव पाठीशी असणार्‍या काँग्रेसी मंडळींच्या सकारात्मक विचारसरणीची गेल्या दहा-पंधरा वर्षात जणू टिंगलटवाळी होवू लागली आहे. सन 2014 मध्ये देशात सत्तांतर झाल्यानंतर काँग्रेसने खरंतर अपयशाच्या कारणमिमांसेचा मागोवा घेत सखोल चिंतन करण्याची गरज होती. परंतु, झालं उलटचं. चिंतन करण्याऐवजी काँग्रेसच्या लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करीत काँग्रेसच्या संस्कृतीला धक्का पोहोचविणार्‍या गरळ ओकल्या. याचा व्हायचा तोच परिणाम झाला अन् काँगे्रसपासून सर्वसामान्य सुध्दा दूर पळू लागला. परिणामी, अपयशाच्या खाईत पडलेल्या काँग्रेसचा पाय दिवसेंदिवस आणखीनच खोलात पडत गेला. याला कारण काँग्रेसची मंडळीच असल्याचे आता लपून राहिले नाही. अविचारी वाचाळवीरांमुळे काँग्रेस सातत्याने तोंडावर आपटत आली आहे. राहुल गांधींनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर वाचाळवीरांना मोकळं रान मिळालं होतं. या मंडळींच्या बेताल वागण्याचा फटका काँग्रेसला बसत गेला अन् पक्षातील दिग्गज नेत्यांबरोबरच समाजातील बहुसंख्य काँग्रेेसच्या पाईकांनी पक्षाच्या प्रवाहापासून दूर जाणे पसंद केलं. वाचाळवीरांचा सेनापती राहिलेल्या राहुल गांधी यांनी तर  गेल्या दहा वर्षात आपल्या पोरखेळ बोलणं आणि वागणुकीमुळे काँग्रेसला रसातळाला नेलं. यात पक्षातील इतर नेते मागे कसे राहतील. राफेल खरेदी घोटाळ्याच्या विषयावरुन राहुल गांधी यांच्यासह काँग्रेस तोंडावर आपटले. यात मोदी सरकारने गैरव्यवहार केल्याचा आरोप सातत्याने राहुल गांधी करीत राहिले. राफेल व्यवहारात नेमकं काळं किंती अन् गोरं किती हे संबंधितांनाच ठाउक असणार. यात गैरव्यवहार असेल तर कधी ना कधी तरी बाहेर येईलच. परंतु, जवळ सबळ पुरावा नसताना यासंदर्भात आरोप करणे म्हणजे स्वतःला अडचणीत टाकण्यासारखंच झालं. ‘चौकीदार चोर है’चा राहुल गांधींचा नारा न्यायालयाच्या टिप्पणीनंतर हास्यास्पद ठरला. राफेल व्यवहारात घोटाळा झाल्याचं काँग्रेसला सिध्द करता आलं नाही आणि त्यामुळे काँग्रेस तोंडावर पडली. राहुल गांधी अद्याप यात घोटाळा झाल्याच्या आपल्या मतावर ठाम आहेत.
लोकसभा निवडणुकीत आलेल्या अपयशाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपद सोडलं. पक्षातील अनेकजणांनी गळ घालुनही त्यांनी अध्यक्षपद स्वीकारण्यास नकार दिला. अखेर सोनिया गांधी यांची प्रभारी म्हणून अध्यक्षपदी पुन्हा सर्वानुमते निवड करण्यात आली. वास्तविक, काँग्रेसमधील अनेकांना हा निर्णय पटला नाही. त्यांना राहुल गांधी हेच अध्यक्षपदी हवे होते. परंतु, उघडपणे बोलण्यास फारसं पुढं कुणी आलं नाही. एकूणच जनाधार गमावून बसलेल्या काँग्रेसची आजही स्थिती कशी आहे, हे आता देशातील जनतेला चांगलंच ठाउक आहे. किंबहुना, सेक्युलर धोरणाचा टेंबा मिरवणार्‍या काँग्रेसने गेल्या 60-70 वर्षात ठरविक धर्मातील लोकांचे लांगुलचालन कसे केले, हे आता लोकांसमोर येवू लागले आहे. मग तो काश्मिरचा विषय असू देत की राममंदिर निर्माणाचा विषय असू देत. काँग्रेसने नेहमीच सत्याला तिलांजली देत हिंदुविरोधात भूमिका घेतल्याचे आरोप होत आले आहेत. काश्मिरमधून कलम 370 आणि कलम 35ए हटविल्यानंतर खुद्द काश्मिरमधील अनेक नागरिकांनी काँग्रेसला उघडं पाडलं आहे. काँग्रेसने कशा प्रकारे पाकिस्तान धार्जिण्या बाबींना खतपाणी घातलं. परिणामी, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी, अलगवाद्यांनी काश्मिरी जनतेला पत्थरबाजीसाठी कसा वापर केला, हे आता तेथील जनतेच्या तोंडून उघडपणे ऐकायला मिळत आहे. राममंदिर प्रश्‍नी न्यायालयात खटला सुरु असताना रामजन्मभूमी स्थळी पुरातत्व विभागाकडून उत्खनन करण्यात आले होते. तेव्हा वादग्रस्त स्थळी राम मंदिर असल्याचे अनेक पुरावे सापडले होते. त्यावेळी सत्तेत असलेल्या काँग्रेसने मात्र यासंदर्भातील अनेक बाबी जगासमोर येवू दिल्या नव्हत्या, असा आरोप तेव्हाही केला गेला अन् आताही केला जात आहे. अफझल गुरुला फाशी देण्याच्या न्यायालयाच्या निकालानंतर देशातील डाव्या विचारसरणीच्या तसेच जेएनयूत शिकणार्‍या काही मंडळींनी देशात गदारोळ निर्माण केला होता. देशाचे तुकडे करण्याची भाषा केली होती. राष्ट्रवाद पायदळी तुडविणार्‍या या घटनांमागे काँग्रेसचा हात होता, हे लपून राहिले नाही. तुष्टीकरणाच्या धोरणांमुळे काँग्रेस जनाधार हरवून बसलीय. सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीतील लाजिरवाण्या अपयशानंतरही काँग्रेसी मंडळींचं डोकं ठिकाणावर आलं नाही. विरोधाला विरोध करण्याच्या प्रवृत्तीमुळे काँग्रेस विचाराची लढाई विसरली आहे. याचा परिणाम, सध्या दिसत आहे.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अस्तित्वाची लढाई लढावी लागत आहे. अनेक मतदारसंघात काँग्रेसला उमेदवार मिळाले नाहीत. केवळ पक्षालाच नव्हे तर काँग्रेसमधील नेत्यांना सुध्दा मरगळ आली आहे. ज्येष्ठ नेते सुशिलकुमार शिंदे यांनी ‘थकलोय...’ अशा शब्दात नुकतंच केलेलं वक्तव्य काँग्रेस रसातळाला गेल्याचेच द्योतक नव्हे काय? अत्यंत केविलवाणी पक्षाची अवस्था झाली असताना शहाणी होईल ती काँग्रेसची मंडळी कसली? देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दसर्‍याच्या मुहुर्तावर भारतात आणल्या जाणार्‍या राफेल विमानाची फ्रान्समध्ये हिंदू रितीरिवाजाप्रमाणे पुजा केली. राफेलवर कुंकवाने ओम अक्षर काढून या नव्या शस्त्राची पुजा करण्यात आली. यावेळी विमानाच्या चाकाखाली लिंबे ठेवण्यात आली होती. हिंदुंची श्रध्दा आणि परंपरेचा विचार केला तर यात गैर काहीही नाही, असंच कुणीही म्हणेल. सोशल मिडियावर प्रतिक्रिया देवून देशातील अनेकांनी या कृतीचं स्वागतच केलं आहे. जरुर काहीजणांनी यावर टीका सुध्दा केली. कुणी ही अंधश्रध्दा असल्याचं म्हटलं तर कुणी लिंबू-टिंबूत एवढी ताकद असेल तर मग राफेल विमान हवं कशाला, असाही प्रश्‍न उपस्थित केला. पाकिस्तानने तर राफेलची टिंगलटवाळी करणारे टिवि्ट केलं आहे. पाकिस्तानचा जळफळाट कुणीही समजू शकतो. परंतु, देशात राहणार्‍यांसाठी ही बाब अभिमानास्पद अशीच असली पाहिजे. विशेष म्हणजे राफेल व्यवहारात घोटाळा झाला असल्याचे तुणतुणं वाजविणार्‍या काँग्रेसच्या मंडळींनी मात्र यावर जोरदार टिकाटिप्पणी करुन पुन्हा एकदा काँग्रेसच्या विचारधारेचं प्रदर्शन केलं आहे. सध्या याच विषयावरुन देशात जोरदार राजकारण सुरु झालं आहे. काँग्रेसचं नेते संदीप दिक्षित यांनी ‘ड्रामा’ या शब्दात यावर टीका केली. काँग्र्रेसचे दुसरे ज्येष्ठ नेते मलिकार्जुन खरगे यांनीही ‘तमाशा करण्याची गरज काय होती, हा निव्वळ देखावा आहे’ अशा शब्दात टीका केली आहे. विजयादशमीला शस्त्रांची पूजा करणे ही आपल्या देशाची मोठी परंपरा आहे. संदीप दिक्षित यांच्या मातेचं काही दिवसांपुर्वीच निधन झालं. तेव्हा त्यांनी विधिवत पूजा करुन अंत्यसंस्काराचे सोपस्कर पार पाडले होते. संदीप दिक्षिति यांना तेव्हा अंधश्रध्दा दिसली नाही. मात्र, आता राफेलच्या पुजनावेळी त्यांना अंधश्रध्दा दिसते. जनतेने याचा अर्थ काय लावायचा? सदृढ लोकशाहीसाठी विरोध ही संकल्पना महत्वाची ठरते, यात वाद असण्याचे कारण नाही. परंतु, विरोधाला विरोध म्हणून कुठेही विरोध करण्याचे धोरण हे नीतीमत्ता रसातळाला गेल्याचे द्योतक म्हणावे लागेल. काँग्रेसकडून सध्या नेमकं हेच सुरु आहे.