Breaking News

रविचंद्रन आश्‍विनची मुरलीधरनच्या कामगिरीशी बरोबरी

आश्‍विनच्या फिरकीसमोर आफ्रिकेची शरणागती

विशाखापट्टणम/वृत्तसंस्था
विशाखापट्टणम कसोटी भारतीय गोलंदाजांनी पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. रोहित शर्माचं शतक आणि मयांक अग्रवालच्या द्विशतकी खेळाच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 502 धावांपर्यंत मजल मारली. यानंतर रविचंद्रन आश्‍विनने आपल्या फिरकीच्या जोरावर आफ्रिकेच्या 7 फलंदाजांना माघारी धाडत भारताला पहिल्या डावात 71 धावांची आघाडी मिळवून दिली. दुसर्‍या डावातही आश्‍विनने आपल्या फिरकीची कमाल दाखवणं सुरुच ठेवलं.
थेनूस डी-ब्रूनचा बळी घेत आश्‍विनने श्रीलंकेचा माजी फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनच्या कामगिरीशी बरोबरी केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 350 बळींचा पल्ला गाठणार्‍या गोलंदाजांच्या यादीत आश्‍विनने मुरलीधरनशी बरोबरी केली. दोन्ही गोलंदाजांनी 66 कसोटी सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. याचसोबत भारतीय गोलंदाजांच्या यादीतही आश्‍विन आता पहिल्या स्थानावर पोहचला आहे. आश्‍विनने 66 कसोटी सामन्यांमध्ये 350 बळी घेतले असून आतापर्यंत कोणत्याही भारतीय गोलंदाजाला ही कामगिरी करता आली नव्हती. भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे याने 77 कसोटींमध्ये 350 बळींचा टप्पा गाठला होता.पहिल्या कसोटी सामन्यात रविंद्र जाडेजानेही आश्‍विनला चांगली साथ दिली.