Breaking News

तरुणाई सोबत रंगला ‘टॉक वुईथ कलेक्टर’ कार्यक्रम

अहमदनगर/प्रतिनिधी
तरुणाईशी थेट संवाद साधत आणि निवडणूक प्रक्रियेविषयी असणार्‍या विविध बाबींची उत्तरे देत जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांचा ‘टॉक वुईथ कलेक्टर’ चांगलाच रंगला. ईव्हीएम, पोस्टल मतदान, प्रचार, मतदार जनजागृती अशा विविध विषयांवरील विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नांना त्यांनी दिलखुलास उत्तरे दिली.
येथील जिल्हा निवडणूक प्रशासनाने स्वीप कार्यक्रमांतर्गत न्यू आर्टस, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजमधील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा, यासाठी स्वीप समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील बाराही मतदारसंघात विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी युवा वर्गाशी संवाद साधला. उप जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील, राहुरी मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी महेश पाटील, नगरचे तहसीलदार उमेश पाटील, स्वीप नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी दिलीप थोरे व स्वीप समिती सदस्य तथा शिक्षणाधिकारी  रमाकांत काटमोरे, दिव्यांगांसाठीचे नोडल अधिकारी तथा जिल्हा समाजकल्याण अधिकारी नितीन उबाळे, न्यू आर्टस् कॉलेजचे प्राचार्य डॉ. भास्कर झावरे आदींची यावेळी उपस्थिती होती. मतदारदूत अमोल बागूल यांनी सूत्रसंचलन केले.
भरगच्च सभागृह, विद्यार्थिनींचा मोठा प्रतिसाद आणि त्यांच्याकडून येणार्‍या प्रश्‍नांना समजावून घेत जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी उत्तरे दिली. विशेषत: ईव्हीएमविषयी असणार्‍या शंकांचे त्यांनी तपशीलवार उत्तरे देत ईव्हीएमच्या शंकांना जणू पूर्णविराम दिला. प्रत्यक्ष निवडणुकीत मतदानासाठी ईव्हीएम वापरण्यापूर्वी ते कोणकोणत्या प्रक्रियेतून जाते, प्रत्येक वेळी पारदर्शकता कशी जपली जाते, प्रत्येक वेळी राजकीय पक्ष व उमेदवारांना या प्रक्रियेवेळी आमंत्रित केले जाते, त्यांच्या उपस्थितीतच या प्रक्रिया पार पाडल्या जातात, अशी सर्व माहिती त्यांनी विद्यार्थ्यांसमोर उलगडली.
निवडणूक यंत्रणेची तयारी सांगत असतानाच मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्ह्याच्या स्वीप समितीमार्फत मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत, त्याची माहिती त्यांनी दिली. शहरातील सात महाविद्यालयांमधील सातशेहून अधिक विद्यार्थी या ’टॉक वुईथ कलेक्टर’ कार्यक्रमात सहभागी झाले होते.
लोकशाही, निवडणूक, भारत निवडणूक आयोग, मतदान व देशाच्या प्रक्रियेमध्ये युवकांची भूमिका काय असावी, याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला. ‘लोकशाहीचा उत्सव’ या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते यावेळी झाले. सेल्फी पॉइंट, मतदार सहायता कक्ष, युथ बूथ आणि क्षेत्रीय प्रचार कार्यालयाच्या स्वीप वाहनाचा उद्घाटन सोहळादेखील यावेळी करण्यात आला.  क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये आणि मान्यवरांच्या उपस्थितीत वाहनास जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी हिरवा झेंडा दाखवला. हे वाहन विविध मतदारसंघात जाऊन मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करणार आहे.
बॅलेट, ईव्हीएम, व्हीव्हीपॅटची विश्‍वासार्हता, नोटा या संकल्पनेबद्दल माहिती, स्वीप कार्यक्रम म्हणजे काय?, लोकशाहीबद्दल आपली भूमिका, मतदार यादीमध्ये नावनोंदणीची पद्धत, राष्ट्रीय मतदार ओळखपत्रबद्दल माहिती, दिव्यांग मतदारांसाठीच्या सोयीसुविधा, हेल्पलाईन क्रमांक 1950 आणि सी-व्हिजील यावरील विविध प्रश्‍नांनाही त्यांनी उत्तरे दिली.
यावेळी संतोष कानडे,  स्वाती अहिरे, गणेश ढोले, राहुल पाटोळे, नाना डोंगरे, आकांक्षा ढोरजकर, प्रताप अहिरे, सतीश शिर्के या कॅम्पस अ‍ॅम्बॅसिडरचा सत्कारही जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या हस्ते करण्यात आला.