Breaking News

भाजप विरुद्ध चांगली लढत देण्याची संधी प्रचार सोडून राहुल गांधी बँकॉक दौर्‍यावर!

नवी दिल्ली
पाच महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत झालेला ऐतिहासिक पराभवानंतर काँग्रेस पक्ष अद्याप सावरलेला नाही. लोकसभेतील पराभवानंतर पक्षाला नव्याने संधी मिळत आहे ती महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन राज्यातील विधानसभा निवडणुकीत कमबॅक करण्याची. पण काँग्रेसमधील अंतर्गत कलह काही संपण्याची चिन्हे नाहीत. महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्यात भाजपची सत्ता आहे. भाजप विरुद्ध चांगली लढत देण्याची संधी काँग्रेसला असताना पक्षासाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील अंतर्गत कलह बाजूला ठेवून लढण्याची वेळ आली असताना काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि स्टार प्रचारक राहुल गांधी बँकॉकला रवाना झाले आहेत. देशातील दोन महत्त्वाच्या राज्यातील निवडणुका दोन आठवड्यांवर असताना राहुल गांधींच्या या दौर्‍यावर प्रश्‍नचिन्ह उपस्तित झाले आहेत. विशेष म्हणजे बँकॉकला जाण्याची राहुल गांधी यांची ही पहिली वेळ नाही. याआदी 2015मध्ये देखील ते बँकॉकला गेले होते तेव्हा देखील अशाच पद्धतीने प्रश्‍न विचारले जात होते. राहुल गांधी विस्तारा कंपनीच्या विमानाने बँकॉकला रवाना झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर बँकॉक हा शब्द ट्रेंड करत आहेत. यातील सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे पक्षाने या दोन्ही राज्यातील प्रचाराच्या यादीत राहुल गांधी यांचा समावेश स्टार प्रचारक म्हणून केला आहे.
राहुल गांधी यांच्या दौर्‍यावर भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विटवरून टीका केली आहे. तुम्हाला माहित आहे का बँकॉक हा शब्द का ट्रेंड होतोय, अशा शब्दात मालवीय यांनी काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांना टोला लगावला आहे. विशेष म्हणजे पक्षातील महत्त्वाचे नेते बँकॉक दौर्‍यावर का गेले आहेत यासंदर्भात अद्याप काँग्रेसकडून अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्यात 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे तर निकाल 24 तारखेला जाहीर होणार आहे. अशा महत्त्वाच्या वेळी पक्षातील दुसर्‍या क्रमांकाचे नेते दौर्‍यावर गेल्यामुळे विरोधकांना टीका करण्याची संधी मिळाली आहे. दरम्यान काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी बँकॉकला गेले नसून ते कंबोडियाला गेले आहेत. तेथे ते 5 दिवसांच्या ध्यान शिबिरासाठी गेल्याचे सूत्रांकडून कळते. पण या वृत्ताला काँग्रेस पक्षाकडून अद्याप दुजोरा मिळालेला नाही.

पक्षात गोंधळाचे वातावरण
दोनच दिवसांपूर्वी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पक्षात लोकशाही नसल्याचा आरोप केला होता. तसेच विधानसभा निवडणुकीत प्रचार करणार नसल्याचे सांगितले होते. याशिवाय महाराष्ट्र काँग्रेसमध्ये देखील गटबाजीमुळे पक्ष विस्कळीत झाला आहे. अशीच परिस्थिती हरियाणामध्ये देखील आहे. माजी प्रदेशाध्यक्ष अशोक तंवर यांनी तिकीट वाटपात घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. उमेदवारी देताना राहुल गांधी यांच्या जवळच्या लोकांना बाजूला केल्याचा आरोप होत आहे.

2015 मध्ये 60 दिवसांसाठी परदेशात
याआधी 2015मध्ये राहुल गांधी बँकॉकला गेले होते. तेव्हा ते 60 दिवसांच्या सुट्टीनंतर भारतात आले होते. अर्थात तेव्हा ते काँग्रेसचे उपाध्यक्ष होते आणि त्यामुळेच त्यांच्या इतक्या मोठ्या सुट्टीवर प्रश्‍न उपस्थित झाले होते. राहुल गांधी 16 फेब्रुवारी 2015 रोजी बँकॉकला गेले होते आणि ते दोन महिन्यांनी म्हणजेच 16 एप्रिल रोजी भारतात परत आले होते.

पराभवानंतर  राजीनामा

लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या पराभवानंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला हबोता. त्यानंतर पक्षाने सोनिया गांधी यांच्याकडे पुन्हा एकदा अध्यक्षपद सोपवले होते.