Breaking News

सरावादरम्यान विमान कोसळले; दोन शिकाऊ पायलटचा मृत्यू

हैदराबाद
प्रशिक्षणादरम्यान उड्डाण केल्यानंतर अचानक इंजिनात बिघाड झाल्याने विमान कोसळले.
खासगी विमान प्रशिक्षण अ‍ॅकॅडमीचे एक विमान सरावादरम्यान कोसळल्याने यात दोन शिकाऊ पायलटचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तेलंगणा राज्यातील विकाराबाद जिल्ह्यातील सुलतानपूर गावात रविवारी सकाळी ही दुर्घटना घडली. सरावासाठी उड्डाण केल्यानंतर काही वेळातच हे विमान येथील एका कपाशीच्या शेतात कोसळले. इंजिनात बिघाड झाल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रकाश विशाल आणि अमनप्रीत कौर असे या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्या दोन शिकाऊ पायलट तरुणांची नावे आहेत. हे दोघेही हैदराबादमधील राजीव गांधी एव्हिएशन अ‍ॅकॅडमीचे विद्यार्थी होते. प्रशिक्षणादरम्यान त्यांनी रविवारी सकाळी बेगमपेट विमानतळावरुन उड्डाण केले होते.
उड्डाणानंतर तासाभरात त्यांच्या विमानाचा रडारशी संपर्क तुटला. त्यानंतर विमान कोसळल्याची खात्री झाल्यानंतर स्थानिक पोलिसांना कळवण्यात आले. त्यानंतर विकाराबाद पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी कोसळलेल्या विमानाच्या अवशेशातून दोन्ही पायलटचे मृतदेह बाहेर काढले. दर्घटनास्थळी कोणालाही जाण्यास सध्या बंदी घालण्यात आली असल्याची माहिती विमानतळ अधिकार्‍यांनी दिली. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील शिरपूर येथे शुक्रवारी अशाच प्रकारे एका प्रशिक्षण संस्थेचे विमान कोसळले होते.