Breaking News

जामखेड तालुक्याला परतीच्या पावसाने झोडपले

उडीद, बाजरी, सोयाबीनचे नुकसान ; शेतकर्‍यांची तारांबळ

जामखेड/प्रतिनिधी
तालुक्यातील वेगवेगळ्या भागात काल गुरूवारी सायंकाळी उशीरा पावसाने जोरदार हजेरी लावली. तालुक्यातील पाच मंडळापैकी सर्वाधिक पाऊस नायगाव (47 मीमी) मंडळात पडला. तर सर्वात कमी आरणगाव (5 मीमी) पडला. खर्डा शहरासह परिसरातील अनेक गावांना परतीच्या पावसाने झोडपले.
वादळी वारा व पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मुळून पडली. विद्युत खांब कोसळले. विद्युत पुरवठा खंडित झाला. दिघोळ येथे एका घरावर वीज पडली. मात्र, जीवीत हानी झाली नाही. आचानक आलेल्या पावसामुळे सर्वत्र बाजार करू व शेतकर्‍यांची तारांबळ उडाली. अचानक आलेल्या पावसामुळे खर्डा येथील आठवडी बाजार करुंचे मोठे हाल झाले. तसेच शेतकर्‍यांचे उडीद, बाजरी, सोयाबीन भिजून नुकसानाचा फटका शेतकर्‍याला बसला. तसेच दिघोळ येथील दिगंबर कोथळे यांच्या घरावर वीज पडून घराचे नुकसान झाले. कुठलेही जीवितहानी झाली नाही. तसेच खर्डा शहरात मध्यवर्ती ठिकाणी जाणार्‍या कौतुका नदीला मोठा पूर आला. पूर पाहण्यासाठी ग्रामस्थांचे झुंबड उडाली. खर्डा शहरासह धामणगाव, तेलंगशी मोहरी, गवळवाडी, माळेवाडी, दिघोळ, जातेगाव, गितेवाडी मुंगेवाडी, नागोबाची वाडी, मोहरी यासह नान्नज, नायगाव, जामखेड या भागाला परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले.

तालुक्यातील पाऊस (मीलीमिटरमध्ये)
जामखेड (7 मीमी), आरणगाव (5 मीमी), नायगाव (47 मीमी), खर्ड़ा (19 मीमी), नान्नज (27 मीमी) या पाच मंडळात परतीचा पाऊस झाला. परतीच्या पावसामुळे मोहरी तलावाच्या पाणी पातळीत वाढ झाली.