Breaking News

कुख्यात गुंड रवी पुजारी सेनेगलमधून फरार

अहमदाबाद
कुख्यात गुंड छोटा राजन यांचा विश्‍वासू साथीदार रवी पुजारी आफ्रिकेतील सेनेगल देशातूनही फरार झाला आहे. विशेष म्हणजे रवी पुजारीला याच वर्षी सेनेगल पोलिसांनी अटक केली होती. तो जामिनावर सुटला होता. रवी पुजारीच्या विरोधात भारतात खंडणीचे 200 गुन्हे दाखल आहेत.
  सेनेगलमध्ये पुजारी हा अँथोनी फर्नांडिस नावानं राहत होता. बुर्किना फासो देशाचा नागरिक असल्याची बतावणी त्यानं केली होती. गुजरातमध्ये रवी पुजारीवर 26 गुन्हे दाखल आहेत. याच प्रकरणी तपास करत असलेल्या पोलिसांनी तो फरार झाल्याची माहिती दिली आहे. तो आफ्रिकेतील दुसर्‍या एखाद्या देशात गेला असल्याचा पोलिसांचा कयास आहे.
  गुजरातमधील बिल्डर, व्यावसायिक, सोने व्यापारी व राजकीय नेत्यांना फोनवरून धमक्या देऊन रवी पुजारी खंडणी वसूल करायचा. तब्बल 70 लोक त्यांच्या निशाण्यावर होते, अशी माहिती गुजरातच्या गुन्हे शाखेनं दिली आहे. काही पीडितांनी घाबरून जाऊन त्याला खंडणीही दिली होती. खंडणीच्या 26 प्रकरणांबरोबरच आनंद जिल्ह्यातील प्रग्नेश पटेल याच्यावरील गोळीबाराप्रकरणी त्यांची चौकशी सुरू आहे. पुजारीनं या सर्व गुन्ह्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.

भारतानं सेनेगलकडे पुजारीच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे. पुजारीचा ठाकठिकाणा मिळवण्यासाठी परराष्ट्र व गृहमंत्रालयाचे अधिकारी सेनेगल सरकारच्या संपर्कात आहेत, अशी माहिती अहमदाबाद गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍यानं दिली. पुजारी पकडला गेल्यास त्याला आधी सेनेगलच्या नियमानुसार तिथं शिक्षा भोगावी लागणार आहे. त्यानंतरच त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू होईल, असं सूत्रांनी सांगितलं.