Breaking News

नेवाशात जोग महाराजांच्या निर्याण शताब्दीनिमित्त जय्यत तयारी

नेवासे/प्रतिनिधी
 नेवासे येथील संत ज्ञानेश्‍वर महाराज मंदिराचे निर्माते वैकुंठवाशी बन्सी महाराज तांबे यांचा 25 वा पुण्यतिथी महोत्सव व आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यापक सद्गुरू जोग महाराज यांच्या निर्याण शताब्दी महोत्सव 13 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीत एकत्रित साजरा होणार आहे. नेवासे येथे होणार्‍या या महोत्सवाची सद्या जय्यत तयारी सुरू आहे.
गुरुवर्य भास्करगिरी महाराज देवगड व शांतीब्रम्ह हभप गुरुवर्य मारोती महाराज कुर्‍हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व संत ज्ञानेश्‍वर महाराज मंदिराचे प्रमुख गुरुवर्य शिवाजी महाराज देशमुख यांच्या अधिपत्याखाली साजरा होणार्‍या अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळयामध्ये आळंदी येथील रविदास महाराज शास्त्री, हरिभक्त परायण, ज्ञानेश्‍वर माऊली कदम, नेवासे येथील शिवाजी महाराज देशमुख, आळंदी येथील मीराबाई महाराज मिरीकर, नागपूर येथील रामायणाचार्य रामराव महाराज ढोक (नागपूर) गाथामूर्ती हभप रामभाऊ महाराज राऊत, जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी येथील संदीपान महाराज शिंदे हासेगावकर यांचे किर्तनांचे कार्यक्रम दुपारी 3 ते 5 यावेळेत संपन्न होणार आहे.
तसेच या सोहळ्यात पहाटे 4 ते 6 काकडा भजन, आरती, सकाळी 6 ते 7 विष्णू सहस्त्रनाम, सकाळी 7 ते 11 ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी ग्रंथाचे सामुदायिक पारायण, दुपारी 11 ते 1 महाप्रसाद, दुपारी 1 ते 2 रामकृष्ण हरी जप, दुपारी 3 ते 5 यावेळेत नामवंत कीर्तनकारांची कीर्तने त्यानंतर सायंकाळी 5 ते 7 महाप्रसाद, रात्री 8 ते 10 संगीत भजन रात्री 10 ते पहाटे 4 वाजेपर्यंत हरीजागर असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहे.
हा सोहळा वैभवशाली होण्यासाठी भाविकांनी आर्थिक योगदान देऊन हातभार लावावा, असे आवाहन गुरुवर्य भास्करगिरी महाराज, श्रीराम साधना आश्रमाचे प्रमुख महंत सुनीलगिरी महाराज, हरीभक्त परायण पंढरीनाथ तांदळे महाराज, संत ज्ञानेश्‍वर महाराज मंदिराचे प्रमुख शिवाजी महाराज देशमुख, नंदकिशोर महाराज खरात, अमृतानंद महाराज कांकरिया, मंदिर विश्‍वस्त माजी आमदार पांडुरंग अभंग, ज्ञानेश्‍वर माऊली शिंदे, रामभाऊ जगताप, भिकाजी जंगले, कृष्णा भाऊ पिसोटे, कैलास जाधव, मंदिर व्यवस्थापक भगवानराव सोनवणे यांनी केले आहे.
मंदिर प्रांगणात होणार्‍या या सोहळयात महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून संत मंडळी व वारकरी भाविक येणार असल्याने त्यांची रहाण्याची व्यवस्था व नियोजन देखील सुरू आहे. मंदिर प्रांगणात होणार्‍या अखंड हरिनाम सप्ताहासाठी भव्य मंडपाची उभारणी करण्यात आली असून पारायण सोहळयासाठी सहभागी होणार्‍या भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने देखील संत ज्ञानेश्‍वर महाराज देवस्थानच्या वतीने नियोजन सुरू आहे.