Breaking News

प्रणिती शिंदेंना आडम मास्तरची धमकी

Praniti Shinde
राज्यभरात निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. यामध्ये प्रचारसभा, भाषणे आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. मात्र अनेकदा एकमेकांवर आरोप करताना उमेदवार पातळी सोडताना दिसतात. असंच काहीसं प्रकरण पुढे आलं आहे ते सोलापूर शहर मध्यम मतदारसंघामधून. राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मात्र प्रचारादरम्यान एका उमेदवाराने प्रणिती यांना ‘तुझ्या बापाला तुरुंगात टाकल्याशीवाय स्वस्थ बसणार नाही’ अशी धकमीच दिली आहे.

सोलापूर शहर मध्यम मतदारसंघामधून प्रणिती यांच्याविरोधात ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम निवडणुकीच्या मैदानात उभे राहिले आहेत. आडम मास्तर म्हणून ओळखले जाणारे नरसय्या यांचा एका सभे दरम्यान तोल सुटला आणि त्यांनी प्रणिती यांना थेट धमकीच दिली. ‘तुझ्या बापाला तुरुंगात टाकल्याशिवाय आडम मास्तर शांत बसणार नाही. जो पंतप्रधानाला सोलापूरामध्ये आणण्याची ताकद ठेवतो तो कोणालाही तुरुंगामध्ये घालू शकतो,’ असं आडम मास्तर आपल्या भाषणात म्हणाले. तसेच पुढे बोलताना त्यांनी माझ्यावर 170 प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल असून हा आकडा 200 झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असंही सांगितलं. ‘हे गुन्हे म्हणजे माझ्यासाठी अलंकार आहेत,’ असे वक्तव्यही आडम यांनी केले. आडम यांच्या या वक्तव्यावरुन राजकीय वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, सोलापूरमध्ये एका जाहीर कार्यक्रमात सुशील कुमार शिंदे यांनी भविष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी एक होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ‘काँग्रेस आणि राष्ट्रवादी भविष्यात एक होण्याची शक्यता आहे. खरंतर शरद पवार आणि माझ्यात फक्त साडेआठ महिन्यांचा फरक आहे. कधीकाळी आम्ही एकाच आईच्या मांडीवर वाढलो आहोत. जे झालं त्याबाबत आमच्याही मनात खंत आहे आणि त्यांच्याही मनात खंत आहे. पण ते कधी बोलून दाखवत नाहीत. पण वेळ येईल तेव्हा ते नक्की बोलून दाखवतील,’ असं वक्तव्य शिंदे यांनी केलं.