Breaking News

पिचडांनी आदिवासी समाजास विकासापासून ठेवले दूर

  आमदारकी धोक्यात येऊ नये यासाठीच कुटील खेळी


अकोले/प्रतिनिधी
आदिवासी समाजाचे मोठे नेते म्हणून मिरवणारे माजी मंत्री पिचड यांच्या तालुक्यात एकही मोठा आदिवासी नेता दिसत नाही. मोठा नेता म्हणून अकोले तालुक्यात फक्त मधुकर पिचड आणि आमदार वैभव पिचड यांचीच ओळख आहे. अकोले तालुक्यात आदिवासी माणसाला पिचडांनी एकही मोठे पद दिले नाही. आदिवासी माणूस मोठा होईल असे काहीही धोरणे त्यांनी राबवलेली दिसत नाहीत. त्यांनी मुद्दामच विकास केला नाही, कारण आदिवासी माणूस मोठा झाला तर त्यांची आमदारकी धोक्यात येईल. व तसे होऊ नये यासाठी त्यांनी आदिवासी जनतेला विकासापासून दूर ठेवले.

   या तालुक्यात सहकाराचे एक मोठे जाळे आहे. पण दूध संघ, साखर कारखाना, कृषि उत्पन्न बाजार समिती, शैक्षणिक संस्था, या कोणत्याही संस्थेवर आदिवासी माणूस अध्यक्ष म्हणून झाला नाही. आदिवासी या नावाने राजकारण करायचे आणि आदिवासी लोकांना मोठे करायचे नाही हीच राजकीय खेळी त्यांची राहिली आहे. या आदिवासी समजासाठी त्यांनी स्वतंत्र बजेट आणले. पण त्या बजेटमध्ये त्यांच्याच तालुक्यात किती निधी आला आहे हा संशोधनाचा विषय आहे. आज आदिवासी तरुण बेरोजगार झाला आहे. आदिवासी भागातील शेतकरी आज मोठ्या संख्येने रोजगार मिळवण्यासाठी नारायण गावाला जात आहे. बेरोजगारीमुळे व शिक्षणाच्या अभावी 18 ते 20 वर्षांची मुले दारूच्या नशेच्या आहारी जात आहेत.

   आदिवासी समाज्यासाठी ९ टक्के बजेटची तरतुद आहे. त्या तुलनेत समाजाचा विकास नाही. निधी, तरतुद आणि विकास यांचे कोठेही 'संतुलन' बसत नसल्याचे चित्र आहे. खेड्यापाड्यांमध्ये अजूनही डांबरी रस्ते नाहीत. क्षेत्रफळाने मोठा आणि मीनी जम्मू-कश्मिर अशी ओळख असूनही अद्याप दळण-वळणाच्या सुविधा येथे नाहीत. एकीकडे महिलांनी चंद्रावर पाऊले टाकले आहे तर येथे  महिला दवाखान्यात पाऊल टाकू शकत नाही, मरण दारशी आले आहे अशी परिस्थिती आहे. किती मोठा विरोधाभास आहे हा. हेच वास्तव आहे या तालुक्याचे. आरोग्य नाही, शिक्षण नाही, रोजगार नाही, पर्यटन नाही किती प्रश्न मांडावेत, त्याला कोणतेच उत्तर शोधून सापडत नाही. त्यामुळे 'विकास' करायचा असेल. तर 'परिवर्तन' हवे आहे. यावर प्रत्येक व्यक्ती ठाम झाला असून येथील तरूण रस्त्यावर उतरुन बदलाची ही 'मशाल' स्वत: घेऊन पळत सुटला आहे.

  खऱ्या अर्थाने एकंदरीत मतदार संघाची परिस्थिती पाहता पिचडांनी जनतेची केलेली फसवणूक पिचडांच्या पराभवाला कारणीभूत ठरणार आहे, पिचडांचा पराभव निश्चित आहे. राष्ट्रवादीचे नेते जाणते राजे खा. शरद पवार यांनी काल  अकोलेत  केलेल्या भाषणात ' पिचडांनी ४० वर्षांत गवत उपटले का?' अशी टीका करत त्यांचा नाकर्तेपणा आणि पळपुटेपणा सिद्ध केला आहे. त्यामुळे आता पिचडांचा पराभव अटळ आहे.