Breaking News

कल्याणमध्ये आघाडी-मनसे साथसाथ

कल्याण
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारीवरून पक्षात जोरदार खेचाखेच सुरू असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या मतदारसंघात अगदी उघडपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची साथ करण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाटयाला आला आहे. मात्र, या ठिकाणी पक्षाने कुणालाही उमेदवारी दिलेली नाही. या ठिकाणी शिवसेनेत सुरू असलेल्या सुंदोपसुंदीचा फायदा मनसेचे उमेदवार राजू पाटील यांना मिळावा यासाठी ही रणनीती आखण्यात आल्याची चर्चा आहे.
ठाणे जिल्ह्यातील विधानसभेच्या 18 जागांपैकी सर्वाधिक चुरस कल्याण ग्रामीण मतदारसंघात पाहायला मिळेल असा अंदाज आतापासूनच बांधला जात आहे. या ठिकाणी शिवसेनेचे विद्यमान आमदार सुभाष भोईर यांना ‘मातोश्री’वरून एबी फॉर्म देण्यात आला. मात्र त्यानंतर शिवसेनेत या उमेदवारीवरून विरोधाचे सूर उमटू लागले. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे भोईर यांच्या कामगिरीवर समाधानी नसल्याची अनेक दिवसांपासून चर्चा आहे. शिंदे यांच्या कट्टर समर्थकांनी भोईर यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेत काम करणार नाही, असा सूर लावला.  डोंबिवली भागातील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश सुकर्‍या म्हात्रे यांना उमेदवारी मिळावी यासाठी शिवसेनेच्या एका मोठया गटाने आग्रह धरला. त्यामुळे रमेश म्हात्रे यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी देण्यात आली.

आघाडीचा पाठिंबा
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनंतरही ग्रामीणचे विद्यमान आमदार सुभाष भोईर माघार घेण्यास तयार नाहीत. दिव्यातील नगरसेवकांचा एक मोठा गट त्यांच्याही सोबत आहे. त्यामुळे बुधवारी भोईर यांनीही शक्तिप्रदर्शन करत समर्थकांची बैठक घेतली. शिवसेनेतील ही खेचाखेची टोकाला पोहोचल्याचे लक्षात येताच राष्ट्रवादीने या मतदारसंघात ऐनवेळेस उमेदवारच द्यायचा नाही असा निर्णय घेत मनसेला उघड मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाणे शहरातील बोलणी फिस्कटली
ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार संजय केळकर यांच्या विरोधात मनसेने अविनाश जाधव यांना उमेदवारी दिली आहे. येथेही काँग्रेस आघाडीने मनसेला साथ द्यावी, असा प्रस्ताव ‘कृष्णकुंज’वरून मांडला गेल्याची चर्चा आहे. कळवा-मुंब्य्राचे आमदार जितेंद्र आव्हाड हेदेखील यास सकारात्मक होते असे बोलले जाते. मात्र, ठाण्यातील पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक नजीब मुल्ला आणि शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी हा प्रस्ताव नाकारत निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानुसार राबोडी भागातील पक्षाचे नगरसेवक सुहास देसाई यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.