Breaking News

असा दिसतो प्रकाशमान चंद्र, आपल्या ऑर्बिटरने पाठवला फोटो

 इस्त्रो
चांद्रयान-2 मोहिमेतील ऑर्बिटरमधील स्पेक्ट्रोस्कोपिक उपकरणाने चंद्राच्या पृष्ठभागाचा प्रकाशमान फोटो काढला आहे. चंद्रावरील खनिज आणि चंद्राची रचना समजून घेण्याच्या उद्देशाने हा फोटो काढण्यात आला आहे. या डाटामुळे चंद्राची उत्पति नेमकी कशी झाली ते समजून घेता येणार आहे. ऑर्बिटरमधील वेगवेगळया उपकरणांच्या मदतीने चंद्राचा अभ्यास सुरु झाला आहे. ऑर्बिटरमधील इमेजिंग इन्फ्रारेड स्पकट्रोमीटरने (खखठड) चंद्राच्या पृष्ठभागाचा पहिला प्रकाशमान फोटो पाठवला आहे. ऑर्बिटरने पाठवलेल्या या फोटोमध्ये चंद्रावरील खड्डे स्पष्टपणे दिसतात.
इस्रोचे अध्यक्ष के.सिवन यांनी आधीच ऑर्बिटरमध्ये हाय रेसोल्युशनचे कॅमेरे बसवल्याचे सांगितले होते. चंद्राच्या पृष्ठभागावरुन परावर्तित होणार्‍या सूर्य प्रकाशाचे मोजमाप करण्याच्या दृष्टीने आयआयआरएसची निर्मिती करण्यात आली आहे. दरम्यान 14 ऑक्टोंबरला नासाच्या एलआरओ ऑर्बिटरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरचे फोटो काढले. दक्षिण ध्रुवावरच विक्रमचे हार्ड लँडिंग झाले आहे. 17 सप्टेंबरच्या तुलनेत 14 ऑक्टोंबरला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांगला प्रकाश होता. 17 सप्टेंबरला संधी प्रकाशाची वेळ असल्याने विक्रमच्या लँडिंग साइटचे स्पष्ट फोटो मिळू शकले नव्हते.
चंद्रावर अंधार पडण्याची ती वेळ असल्याने सावलीमुळे विक्रम लँडरचा ठावठिकाणा कळू शकला नव्हता. एलआरओने पाठवलेल्या ताज्या फोटोंचे नासाचे तज्ञ विश्‍लेषण करत आहेत. भारताच्या चांद्रयान-2 मोहिमेतील विक्रम लँडरचे सात सप्टेंबरला चंद्रावर लँडिंग होणार होते. पण अखरेच्या काही मिनिटांमध्ये विक्रमचा इस्रोच्या नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क तुटला. तेव्हापासून विक्रम लँडरचा शोध सुरु आहे. आता 10 नोव्हेंबरला नासाचा ऑर्बिटर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरुन जाणार आहे.
विक्रमचे लँडिंग फसले तरी चांद्रयान-2 मोहिम संपलेली नाही हे इस्रोने आधीच स्पष्ट केले होते. कारण ऑर्बिटर चंद्रापासून 100 किमीच्या कक्षेत भ्रमण करत आहे. पुढची साडेसातवर्ष ऑर्बिटरचे चंद्रावरील शोधकार्य सुरु राहणार आहे. विक्रम लँडरच्या आतमध्ये प्रग्यान रोव्हर होता. विक्रम लँडर आणि रोव्हरची रचना 14 दिवसांच्या हिशोबाने करण्यात आली होती. कारण चंद्रावरचा एक दिवस पृथ्वीवरच्या चौदा दिवसांसमान असतो. रात्रीच्या वेळी चंद्रावर कडाक्याचा थंडावा असतो. अशा वातावरणात ही उपकरणे तग धरण्याची शक्यता नव्हती.