Breaking News

निवडणुक कामात टाळाटाळ केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याचे आदेश

शेवगाव/प्रतिनीधी
शेवगाव-पाथर्डी (222)  विधानसभा मतदार संघ निवडणुकीसाठी निरीक्षक रहेमान यांच्या बैठकीला गैरहजर राहिल्याबद्दल तसेच नोटीस दिल्यानंतर वेळेत लेखी वा समक्ष खुलासा सादर न केल्याप्रकरणी नगरचे स्थानिक निधी लेखा अधिकारी हरिशंकर खेडकर यांच्यावर निवडणुक कामामध्ये दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत त्यांच्या विरोधात शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी दिले आहेत.
नगर येथील स्थानिक निधी लेखा कार्यालयातील हरीशंकर खेडकर यांची शेवगाव-पाथर्डी विधानसभा निवडणुकीसाठी मतदार संघामध्ये उमेदवारांच्या खर्चविषयक संनियत्रण कामासाठी नियुक्ती जिल्हा निवडणुक अधिकारी यांच्या आदेशान्वये झालेली आहे. दि. 29 सप्टेंबर रोजी  निवडणूक निरीक्षक रहेमान यांनी शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघाला शेवगाव येथे भेट दिली. या वेळी घेण्यात आलेल्या खर्च विषयक बैठकीला खेडकर गैरहजर होते. तसेच नोटीस दिल्यानंतरही दि.4 ऑक्टोबर पर्यंत समक्ष वा लेखी खुलासा खेडकर यांनी सादर केलेला नाही. त्यामुळे, निवडणुक कामात दुर्लक्ष केल्या प्रकरणी लोकप्रतिनीधी अधिनियम 1951 चे कलम 134 (1) अन्वये खेडकर यांच्या विरोधात शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश शेवगावचे पोलिस निरीक्षक यांना निवडणूक अधिकारी केकाण यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तसेच नगर येथील स्थानिक निधी लेखाचे सहाय्यक संचालक यांनाही याबाबत माहितीसाठी आदेशाची प्रत पाठविण्यात आली असल्याचे केकाण यांनी सांगीतले.