Breaking News

अडीच किलोमीटर पर्यंतच पाणी देणाऱ्यांना दूर ठेवा: काळे

हजारोंच्या उपस्थितीत आशुतोष काळे यांचा प्रचाराचा शुभारंभ

कोपरगाव प्रतिनिधी
कालवा सल्लागार समितीच्या बैठका लाभक्षेत्र सोडून मुंबईला घेतल्या. बैठकीत ठरलेल्या आवर्तनांची अंमलबजावणी झाली नाही. त्यावेळी तालुक्याच्या आमदारांनी बघ्याची भूमिका घेतली. कालव्याचे आवर्तन लाभधारक शेतकऱ्यांना शेतीसाठी फक्त अडीच किलोमीटर पर्यंतच दिले गेले. त्यावेळी मूग गिळून गप्प बसणाऱ्या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना अडीच किलोमीटर लांबच ठेवा असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार आशुतोष काळे यांनी केले.

    आशुतोष काळे यांच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार शुभारंभ बुधवार (दि.९) रोजी कोपरगाव येथील विघ्नेश्वर मंदिरात श्रीफळ फोडून करण्यात आला. यावेळी मतदार संघातून हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांच्या विराट जाहीर सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोकराव काळे होते. तत्पूर्वी सकाळी आशुतोष काळे यांनी सकाळी जुनी गंगा देवी मंदिर, श्री. संत जनार्दन स्वामी महाराज मंदिर, काशीविश्वेश्वर देवस्थान, साईबाबा तपोभूमी तसेच सर्व प्रमुख मंदिरांमध्ये जावून मनोभावे पूजा केली. तसेच प.प. रमेशगिरिजी महाराज यांचे आशीर्वाद घेतले.

  यावेळी पुढे बोलताना आशुतोष काळे म्हणाले की, शासनाचे निर्णय घेण्याचे काम असते. शासनाने घेतलेले निर्णय हे आपल्या मतदार संघातील शेतकरी, कष्टकरी, महिला, सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, व समाजातील सर्वच घटकांच्या हिताचे आहेत की अन्याय करणारे याची पडताळणी करून चांगल्या निर्णयांचे स्वागत व चुकीच्या निर्णयांच्या विरोधात आवाज उठविण्याचे काम हे तालुक्याच्या लोकप्रतिनिधींचे असते. मात्र मागील पाच वर्षात कोपरगाव विधानसभा मतदार संघातील जनतेवर सातत्याने अन्याय होत असतांना तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी सरकारच्या हो मध्ये हो मिळविण्याचे काम केले. त्यामुळे मतदार संघातील जनतेवर सातत्याने अन्याय झाला आहे. ज्यावेळी शासनाकडून कोपरगाव तालुका रब्बीच्या अनुदानापासून वगळला गेला, दुष्काळाच्या यादीतून वगळला गेला त्यावेळी जनतेच्या प्रश्नांचे देणे घेणे नसलेल्या तालुक्याच्या आमदारांनी या प्रश्नाकडे कानाडोळा केला. माजी आमदार अशोकराव काळे यांनी चार नंबर साठवण तलावासाठी आणलेला दोन कोटी रुपयांचा निधी श्रेय मिळणार नाही म्हणून परत पाठविला व शहराच्या जनतेला पाण्यापासून वंचित ठेवले. पाच नंबर साठवण तलावाचे काम सुरु करावे यासाठी सातत्याने आंदोलन केले मात्र दुसरीकडे पाच नंबर साठवण तलावासाठी तालुक्याच्या आमदारांचे कोणत्याही प्रकारचे योगदान नाही, कोणताही पत्र व्यवहार नाही असे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या अधिकाराच्या पत्रात स्पष्ट झाले असल्याचे पत्र आशुतोष काळे यांनी भरसभेत दाखविले.

  यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके म्हणाले की, काळे परिवार हा सर्वसामान्य माणसांमध्ये मिसळणारा परिवार आहे. त्यामुळे आशुतोष काळे हे नेहमी सर्वसामान्यांमध्ये मिसळून सर्वसामान्य जनतेसाठी संघर्ष करीत आहे व त्यांच्या मागे जनतेचे मोठे पाठबळ आहे हे मी ज्यावेळी आशुतोष काळे यांनी आमरण उपोषण केले ते आमरण उपोषण सोडतांना मी हजर असतांना अनुभवले आहे. आज प्रचार शुभारंभासाठी झालेली गर्दी पाहून परिवर्तन अटळ आहे. २४ तारखेला आशुतोष काळे यांचा नक्की विजय होणार आहे हे आजच निश्चित झाला हे सभेसाठी उपस्थित असलेल्या विराट गर्दीवरून दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.

  यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके,माजी आमदार अशोकराव काळे, स्नेहल शिंदे, जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका चैताली काळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक उपाध्यक्ष पद्माकांत कुदळे, सर्व संचालक, राष्ट्रीय कॉंग्रेसचे अशोक खांबेकर, तालुकाध्यक्ष नितीन शिंदे, तुषार पोटे, नगरसेवक मेहमूद सय्यद, आर पी आय कवाडे गटाचे उत्तर जिल्हा प्रमुख विजयराव जगताप, तालुका प्रमुख वसंतराव नन्नवरे, शहराध्यक्ष संजय कोपरे, एकतावादी संघटनेचे गौतम घनघाव, शेतकरी संघटनेचे विठ्ठलराव शेळके, एकलव्य संघटनेचे तालुकाध्यक्ष मंगेश औताडे, पंचायत समिती सभापती, उपसभापती, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस व मित्र पक्षातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.