Breaking News

विजयादशमीनिमित्त शमी झाडाच्या पूजनासाठी भाविकांची गर्दी

नेवासे/प्रतिनिधी
एकमेकांना गळाभेट घेत दसर्‍याच्या शुभेच्छा देत नेवासे येथे विजयादशमी दसरा सण पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला.आपट्याच्या पानांचे सोने देवदेवतांना अर्पण करत भाविकांनी श्रद्धेने जामदार वस्तीवर पुरातन महिमा असलेल्या शमीच्या वृक्षाचे दर्शन घेतले. यावेळी शमीचे वृक्ष पूजनासाठी नेवासे येथील भाविकांनी जामदार मळ्यात गर्दी केली होती.
दसरा सणाच्यानिमित्ताने सकाळ पासूनच नेवासेकरांची मोठी लगबग दिसून आली. बाजारात झेंडूची फुले व आपट्याची पाने खरेदी करण्यासाठी लोकांची लगबग दिसून आली. व्यापार्‍यांनी आपल्या वहीच्या पानावर स्वस्तिक काढून विधीवत परंपरेने चालत आलेल्या पद्धतीने पूजन केले. तर बांधकाम क्षेत्रातील कामगारांनी पोटापाण्यासाठी लागणार्‍या कुदळ, फावडे, थापी, घमेले या हत्यारांचे पूजन केले. घरोघरी वह्यापुस्तकाचे पूजन पाटावर ठेऊन रांगोळी काढून करण्यात आले. घरोघरी मंगलमय वातावरण यानिमित्ताने दिसून येत होते.
नवरात्रानिमित्ताने घटस्थापना केलेल्या मंडळासह गावांतील देवी मंदिरासमोर सायंकाळी दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. सायंकाळच्या सुमारास परंपरेने धनगर समाज व माळी समाजाच्या वतीने डफावर थाप देत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीचे उत्स्फूर्त स्वागत नेवासकरांनी केले.या झेंडा काठी मिरवणुकीचा समारोप जामदार वस्ती येथील शमीच्या वृक्ष प्रांगणात करण्यात आला. सायंकाळी जामदार वस्तीवर असलेल्या शमीचे वृक्षासह संत कबीर महाराज मंदिरात ही मोठी गर्दी झाली होती. यावेळी दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांचे आण्णासाहेब जामदार, वसंत जामदार, प्रदिप जामदार, प्रविण जामदार, दीपक जामदार यांनी स्वागत केले. ब्रह्मवृंद मंडळींनी वेदमंत्राचा जयघोष करत आलेल्या भाविकांना शमीची पाने वाटली.