Breaking News

विराटने झळकावलं विक्रमी द्विशतक

Virat Kohli
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पुण्याच्या गहुंजे मैदानात दुसर्‍या दिवसाच्या खेळात अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. चहापानानंतरच्या सत्रानंतर विराटने आपल्या शतकी खेळीचं द्विशतकात रुपांतर केलं आहे. कसोटी कारकिर्दीतलं विराटचं हे सातवं द्विशतक ठरलं आहे. याचसोबत विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये 7 हजार धावांचा टप्पाही ओलांडला. शतकी खेळीचं द्विशतकी खेळीत रुपांतर केल्यानंतर विराटने आफ्रिकन गोलंदाजांचा समाचार घेत 250 धावांचा टप्पा ओलांडला. विराट कोहलीने 254 धावांवर नाबाद असताना दुसर्‍या बाजूने रविंद्र जाडेजा बाद 91 धावांवर बाद झाल्यामुळे भारताने 601 धावांवर आपला डाव घोषित केला.
या खेळीदरम्यान विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 21 हजार धावांचा टप्पा ओलांडला. विराटने माजी खेळाडू सचिन तेंडुलकर आणि ब्रायन लारा यांना मागे टाकलं आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 7 हजार धावांचा टप्पा गाठणार्‍या फलंदाजांच्या यादीत विराटने संयुक्तपणे चौथं स्थान पटकावलं आहे

गेल्या काही वर्षांमध्ये विराट कोहली तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये जबरदस्त फॉर्मात खेळतो आहे. 2016 सालपासून आतापर्यंत विराट कोहलीचं हे सातवं द्विशतक ठरलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे इतर प्रतिस्पर्धी संघातील एकाही फलंदाजाला विराटसारखी कामगिरी करता आलेली नाहीये.

महत्वाची गोष्ट म्हणजे विराट कोहलीने आपल्या कसोटी कारकिर्दीत पहिल्या 41 कसोटी सामन्यांमध्ये एकही द्विशतक झळकावलं नव्हतं. मात्र यानंतरच्या 40 कसोटी सामन्यांत विराटने 7 द्विशतकं झळकावली आहेत. द्विशतकी खेळी केल्यानंतर मुथुस्वामीच्या गोलंदाजीवर विराट झेलबादही झाला होता, मात्र पंचांच्या पाहणीत मुथुस्वामीचा तो चेंडू नो-बॉल असल्याने विराटला जीवदान मिळालं.