Breaking News

संतोषी माता मंदिरात कीर्तन महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

नेवासे/प्रतिनिधी
 नेवासे येथील शिवाजीनगर प्रभागात असलेल्या श्री संतोषी माता मंदिरात नवरात्रीच्या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आयोजित कीर्तन महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. संतांचे कृपा आशीर्वादा शिवाय जीवनात कोणतीच प्राप्ती होत नाही, सुखदुःखा च्या फेर्‍यातून चुकण्यासाठी संतांच्या ग्रंथाचे पारायण करणे गरजेचे आहे. भगवतीचा अंश असल्याने स्त्री शक्तीने अन्यायाविरुद्ध पेटवून उठावे, असे आवाहन महिला किर्तनकार हभप जयाताई घाडगे यांनी यावेळी बोलतांना केले.
यावेळी झालेल्या कीर्तनात बोलताना ह.भ.प. जयाताई घाडगे यांनी स्त्री शक्तीचे नवरात्र उत्सवातील महत्व विषद केले. प्रत्येक स्त्री शक्तिमध्ये भगवतीचा अंश असून तिने तो ओळखावा. अन्यायाचा प्रतिकार करण्याची शक्ती आई जगदंबेच्या भक्तीतून प्राप्त होते. याच भक्तीच्या माध्यमातून भगवंत ही जीवनात मिळतो. असे प्रबोधन त्यांनी यावेळी बोलताना केले. चौर्‍यांशी लक्ष योनीनंतर मनुष्य जन्माची प्राप्ती होते. ते भगवंताचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी असून परमार्थात त्यागाला महत्व आहे. तो त्याग संतांनी जगाच्या कल्याणासाठी केलेला आहे. चंदनापरी आपला देह झिजवून परमार्थाकडे आपल्याला आणले आहे. ही मोठी संतकृपा आपल्यावर झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या कीर्तन महोत्सव प्रसंगी हभप नवनाथ महाराज घाडगे, गायनाचार्य सचिन महाराज पवार, गणेश महाराज दरंदले, देविदास महाराज पवार, रामभाऊ महाराज आढाव, सोहळा संयोजक बाळासाहेब सावंत, विठ्ठलभाऊ मैदाड, सचिन सावंत, नितीन सावंत, विणेकरी विष्णूपंत औटी, रामभाऊ महाराज आढाव, बाळासाहेब आढाव, भानुदास गटकळ, विठ्ठल आहेर, खरात मामा, शामराव आहेर, नाना डिके यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.