Breaking News

सभागृह नेत्याचे कुटुंब डेंग्यूच्या विळख्यात

अहमदनगर/प्रतिनिधी
शहरातील प्रभाग पाच मधील कुष्ठधाम ते भिस्तबाग रोडवरील श्रमिकनगर कमानीसमोर राहणारे मनपा सभागृह नेता स्वप्नील शिंदे यांना डेंग्यूची लक्षणे दिसून आलेली आहे. त्यांचे भाऊ सचिन शिंदे, आई लक्ष्मी शिंदे व भाचा यांना डेंग्यू झाला असून त्यांच्यावर दीपक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. शिंदे यांच्या घराभोवती अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा व घाणीचे साम्राज्य आहे.त्यामुळे सभागृह नेत्यांचे कुटुंब डेंग्यूच्या विळख्यात आले आहे.
अशा परिस्थितीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वैदूवाडी येथील बाबाजी शिंदे या हंगामी कर्मचार्‍याचा रविवारी (दि.25 ऑगस्ट) डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाला होता. आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप करीत शिंदे कुटुंबीयांसह वैदूवाडी येथील नागरिकांनी महापालिकेत मोर्चा आणला होता. त्यावेळी आरोग्य विभागास फवारणी करण्यास, फॅगिंगी करण्यास तसेच औषध फवारणी व साफसफाई, गटार कामगार या सर्व गंभीर बाबींची मागणी करूनही आरोग्य विभागाने उपलब्ध न करून दिल्याने डेंग्यूची लागण झाली आणि बाबाजी शिंदेचा मृत्यू झाला, अशी तक्रार नागरिकांनी निवेदनातून  केली होती.
मनपा विभागाने आजही त्याच भागात 40 दिवसांनंतरही काहीच केले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वच्छ भारत अभियानाच्या नगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाला व वरिष्ठ अधिकार्‍यांना काही देणे-घेणेच नाही असे यावरून दिसत आहे. यावर मनपा आयुक्त काही करणार का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.