Breaking News

‘जयहिंद’कडून दिवाळीनिमित्त सैनिकांना फराळ

संगमनेर/प्रतिनिधी
संगमनेर तालुक्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली लोकशाहीचा महोत्सव आनंदाने साजरा केला. या रणधुमाळीत ही आपले घरदार सोडून देशवासीयांच्या संरक्षणासाठी कटिबद्ध असलेल्या भारतीय सैनिकांना आठवणीने दुर्गाताई तांबें यांच्या पुढाकारातून जयहिंद महिला मंचच्या भगिनींनी दिवाळीचे फराळ पाठविले आहे.
आज पुणे येथे खडकी येथील कॅम्पमध्ये भारतीय सैन्यातील लेप्टनंट कर्नल के.के.गिरी, लखविंदरसिंग यांसह  अधिकार्‍यासह जवानांना हे फराळ देण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, माजी सैनिक रावसाहेब कोटकर, मा.मेजर प्रकाश कोटकर, सुभेदार समशेद खान, निर्मला गुंजाळ, सौदामिनी कान्होरे, अरुंधती रहाणे, शोभा कुडेकर, अमृता लामखडे आदी उपस्थित होत्या.
 पुरोगामी व समतेचा विचार जोपासत अनेक उपक्रम संगमनेरमध्ये सातत्याने राबवले जात आहेत. जिल्ह्यात सांस्कृतिक, वैभवशाली शहर ठरलेल्या संगमनेर तालुक्यातून दुर्गाताई तांबे यांच्या पुढाकारातून मागील 4 वर्षांपासून दिवाळीनिमित्त भारतीय सैनिकांना फराळ देत आहे. यावेळेस हे फराळ पुणे येथील कॅम्प मध्ये आज पोहोच करण्यात आले.
यावेळी सौ.दुर्गाताई तांबे म्हणाल्या, भारतीय सैनिक हे कायम आपल्या परीवारापासून हजारो किलोमीटर दूर असतात. सणासुदीच्या काळातही ते घरी येत नाही. दिवाळी हा भारतातील सर्वात मोठा सण असतानाही हे सैनिक आपल्या देशातील जनतेसाठी कामावर असतात. रात्रंदिवस ऊन, वारा, पाऊस, थंडी ते डोक्यावर घेऊन आपले कर्तव्य पार पाडत असतात. त्यांच्या प्रती आदर भावना व्यक्त करताना तालुक्यातील सर्व बचत गट, महिला मंडळ यांच्यावतीने सैनिकांना दिवाळीचे लाडू शंकरपाळे, शेव, चिवडा व विविध फराळ व राजहंसचे विविध पदार्थ देण्यात आले आहे. या अभिनव उपक्रमात तालुक्यातील अनेक कुटुंबही सहभागी झाले आहे.
कर्नल के.के.गिरी म्हणाले की, सैनिकांच्या प्रती संगमनेरच्या महिला भगिनींनी केलेला आदर आमच्या सर्वांचा सन्मान व आदर वाढविणार आहे. यामुळे सर्व सैनिकांना आपल्या पाठीशी आपले देश बांधव व भगिनी आहे. याचा अभिमान वाटत आहे. फक्त 15 ऑगस्ट व 26 जानेवारीच्या दिवशी राष्ट्रप्रेम न दाखवता सातत्याने सुख दुखात आमची आठवण करता याचा आम्हाला खुप आनंद वाटला. यावेळी निवृत्त सैनिक हवालदार रावसाहेब दादा कोटकर, प्रकाश कोटकर यांनीही मनोगत व्यक्त केले.